चंदगड / प्रतिनिधी
बहुचर्चित चंदगड नगरपंचायतीची निवडणुक आता लागणार की विधानसभेच्या निवडणुकीनंतर लागणार यावर तर्कवितर्क सुरु असताना राज्य निवडणुक आयोगाने काल (ता. 30) अचानक चंदगड नगरपंचायतीची निवडणुक जाहीर केली. निवडणुक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात सुचना देण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आज चंदगड येथील तहसिल कार्यालयात आदर्श आचारसंहितेबाबत तहसिलदार विनोद रणावरे यांनी बैठक आयोजित केली होती.
यावेळी तहसलिदार श्री. रणावरे म्हणाले, ``आचारसंहिता काळात नियोजन समितीची व अन्य समित्यांची बैठक घेता येत नाही. त्या क्षेत्राकरीता कोणतीही नवीन योजना जाहीर करता येत नाही. आचारसंहिता काळात संबंधित विश्रामगृहांचे वाटप करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे राहतील. मतदान केंद्रातील आतील चित्रीकरण, प्रत्यक्ष मतदानाचे, मतदान कक्षाचे, ज्यामुळे मतदानाची गुप्तता भंग होवू शकते अशा कोणत्याही भागाचे चित्रीकरण करता येणार नाही.`` पोलिस निरिक्षक अशोक सातपुते म्हणाले, ``आचारसंहिता लागू झाल्यापासून शस्त्रास्त्र बाळगण्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. ध्वनी क्षेपकांच्या वापराबाबत पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रचार संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी त्या हद्दीत वास्तव्य करु नये असा सुचना दिल्या.`` यावेळी विविध खात्याचे प्रमुख व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या आचारसंहितेच्या बैठकीला प्रसिध्दी माध्यमांच्या कोणत्याही प्रतिनिधीला बोलावण्यात आले नव्हते.
No comments:
Post a Comment