जंगमहट्टी मध्यम प्रकल्प ओवरफ्लो, तालुक्याच्या पूर्व भागाचा पाणी प्रश्न मिटला - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2019

जंगमहट्टी मध्यम प्रकल्प ओवरफ्लो, तालुक्याच्या पूर्व भागाचा पाणी प्रश्न मिटला

जंगमहट्टी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे सांडव्यातून पाणी पडत आहे. 
निवृत्ती हारकारे / कार्वे -प्रतिनिधी
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेला जंगमहट्टी येथील मध्यम प्रकल्प बुधवारी सकाळी पाच वाजता  ओवरफ्लो झाला  आहे. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी आणि होनहाळ नाल्यात पडत आहे. या प्रकल्पावर आधारित असलेले जंगमहट्टी, तुर्केवाडी, माडवळे, मुरकुटेवाडी, मजरे कारवे, मौजे कारवे, मांडेदुर्ग, ढोलगरवाडी सह पूर्व भागातील कामेवाडी पर्यंत च्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. तसेच या  प्रकल्पावर आधारित असलेल्या ग्रामपंचायतींच्या नळपाणी पुरवठा योजनाची अडचण दूर झाली आहे. 
या मध्यम प्रकल्पाची क्षमता १.२२  टीएमसी इतकी आहे. म्हणजेच १२२३.६६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा या प्रकल्पात होतो. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकल्प ओसंडून वाहत आहे. मागच्या आठवड्यात 80 टक्के इतका पाणीसाठा होता मात्र चारच दिवसात हा प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. जंगमहट्टी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय व सांडव्यावरून पाणी पडल्याशिवाय आज पर्यंत होनहाळ नाल्याला कधीही पूर आला नव्हता. मात्र यावर्षी तूर्केवाडी, माडवळे, जंगमहट्टी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याला दोन वेळा अगोदरच पूर आलेला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे हा नाला काठोकाठ भरून वाहत आहे. धरणाच्या सांडव्यावरून पडलेल्या पाण्यामुळे या नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास या नाल्याला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुर्ण क्षमतेने भरलेला जंगमहट्टी प्रकल्प.
                                     धरणक्षेत्र परिसरात आतापर्यंत २०५३ मिलीमीटर पाऊस
पावसाची नोंद झाली आहे गतसाली याच दिवशी या धरण पाणलोट क्षेत्रात 1847 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गत झाली हे धरण २६ जुलै २०१८रोजी भरले होते. यावर्षी मात्र मृग नक्षत्र व आद्रा नक्षत्रानी  हुलकावणी दिल्यामुळे धरण भरण्यास विलंब झाला. मात्र तरीही परिसरात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने या धरणाच्या पातळीत नेहमीच वाढ होत राहिली व अपेक्षापेक्षा कमी वेळात धरण भरले आहे.
                                               प्रकल्पस्थळी पर्यटकांची वाढती गर्दी
धरणाच्या सांडव्यावरून पाणी पडत असल्याने व चारी बाजुला असलेल्या डोंगर कपारीतून येणारे पाणी, धुक्यात लपलेला डोंगर भाग, पश्चिमेस दिसणारा कलानंदिगड हे सौंदर्य पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. आजपर्यंत अनेक वेळा या धरणावर सुरक्षेची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध भागातून पर्यटक येथे येत असतात. त्यामुळे या धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता या ठिकाणी सुरक्षा महत्त्वाची आहे.  पाटणे फाटा- तिलारी  मुख्य रस्त्यापासून धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.  त्यामुळे पर्यटकांना धरण क्षेत्रापर्यंत जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. चार चाकी गाडी घेऊन जाणं मुश्किल बनले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा व धरणावर सुरक्षा ठेवावी अशी मागणी होत आहे.
निवृत्ती हाककारे, कार्वे प्रतिनिधी


No comments:

Post a Comment