कालकुंद्री येथे ताम्रपर्णी नदीतील नाव पुन्हा कार्यान्वित, ग्रामस्थांत समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2026

कालकुंद्री येथे ताम्रपर्णी नदीतील नाव पुन्हा कार्यान्वित, ग्रामस्थांत समाधान

नाव ताम्रपर्णी नदीत कार्यान्वित करताना ग्रामपंचायत कर्मचारी

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    कालकुंद्री (ता. चंदगड) येथे कालकुंद्री व कोवाड दरम्यान ताम्रपर्णी नदीतील नाव (होडी) नादुरुस्त झाल्याने गेले वर्षभर बंद होती. परिणामी नदीच्या पलीकडे शेती असलेले शेतकरी, कोवाड येथे बाजारहाट साठी जाणारे ग्रामस्थ व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची कुचंबना होत होती. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन कालकुंद्री ग्रामपंचायत ने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून नवीन 'नाव' आणली. ती काल नदीत सोडून कार्यान्वित करण्यात आली. यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

नवीन आलेल्या नावेचे पूजन करताना सरपंच, उपसरपंच, मुंबई येथील उद्योजक आर. एच. पाटील, प्रिया जोशी व ग्रामस्थ

  गेली दोन वर्षे नावे अभावी नदीपलीकडे जाणारे शेती असलेल्या शेतकऱ्यांना रोज शेतीकडे जाण्यासाठी, तसेच कोवाड येथे बाजार, दवाखाना बँकेची कामे व इतर कामांसाठी जाणारे ग्रामस्थ, कॉलेज महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणारे तरुण-तरुणी यांना बस गाड्यांची वाट पाहत बसण्या ऐवजी काही मिनिटातच कोवाड येथे चालत जाता येते. या कामी आमदार शिवाजीराव पाटील यांची शिफारस, सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, सदस्य विलास शेटजी, प्रशांत मुतकेकर, विठ्ठल पाटील आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी ओमकार दिवेकर, भाजप कार्यकर्ते भरमू पाटील आदींचा पाठपुरावा व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. 

   शेकडो वर्षांपासून पूर्वजांनी कालकुंद्री- कोवाड दरम्यान असलेल्या ताम्रपर्णी नदीतून कोवाड व पुढे जाण्यासाठी परंपरागत नावेची व्यवस्था केली होती. यासाठी बलुतेदारीवर डोणकरी नेमून त्यांच्या माध्यमातून सुविधा दिली जात होती. सध्या बलुतेदारी इतिहास जमा होण्याच्या मार्गावर असल्याने तसेच रस्त्यांच्या सुविधा वाढल्यामुळे या सेवेत खंड पडत होता. त्यातच दोन वर्षांपूर्वी जुनी नाव फुटून नादुरुस्त झाल्याने नदीपलीकडील शेतकरी, कोवाड ला जाणारे ग्रामस्थ व विद्यार्थी यांना अर्ध्या ते एक किलोमीटर साठी ६-७ किमी अंतर कापून कागणी कोवाड मार्गे शेतीवर यावे लागत होते. यात शारीरिक कष्टाबरोबरच वेळ व पैसा वाया जात होता. हे टाळण्यासाठी वारंवार नाव सुरू करण्याबाबतची मागणी होती. त्याची पूर्तता नुकतीच झाली. २५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर येथून नवीन नाव कालकुंद्री येथे दाखल झाली होती. ती नदीत कार्यान्वित करण्यात आली. कुणालाही सहजपणे पलीकडे जाता यावे यासाठी नावेला लोखंडी तार जोडली आहे. याचा योग्य पद्धतीने व जपून वापर करण्याच्या सूचना ग्रामपंचायत कडून ग्रामस्थ व प्रवाशांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment