'गोवा मराठी अकादमी' गोव्यातील मराठी साहित्यिक, कलाकारांसाठी आधारवड, विस्तारासाठी शासकीय निधी अपेक्षित - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2026

'गोवा मराठी अकादमी' गोव्यातील मराठी साहित्यिक, कलाकारांसाठी आधारवड, विस्तारासाठी शासकीय निधी अपेक्षित

नुकत्याच वास्को गोवा येथे झालेल्या शिवरायांची शौर्यगाथा सांगणाऱ्या महानाट्य 'शिवगाथा' नाट्य प्रयोग सादरीकरण प्रसंगी कलाकार व संस्थेचे पदाधिकारी

चंदगड/ मडगाव : सी एल वृत्तसेवा 

   गोवा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कै मनोहर पर्रीकर यांनी सन २०१६ मध्ये 'गोवा मराठी अकादमी' ची स्थापना केली. गेल्या दहा वर्षात ही संस्था गोवा राज्यातील कवी, कादंबरीकार आदी साहित्यिक, नाट्य, रंगभूमी, चित्रपट कलाकार, भजन, कीर्तनकार, गायक, वादक, संगीत क्षेत्रातील कलाकार व शालेय विद्यार्थी यांच्यासाठी आधारवड ठरली आहे.

   मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्टीतून उदयास आलेल्या या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, उपाध्यक्ष चंद्रकांत गावस व सहकाऱ्यांच्या माध्यमातून गोवा मराठी अकादमी गोवा राज्यातील विविध भागात नियमित साहित्य संमेलने, कवि संमेलने, किर्तन संमेलन, भजन स्पर्धा, नाट्यप्रयोग यांचे आयोजन करते. यामुळे सर्व क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात आपले कौशल्य व कला सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. संस्थेच्या वतीने सर्व क्षेत्रांतील मराठी भाषेच्या कलाकारांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक अनेक कार्यक्रम संस्थेने राबवले असून छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक शौर्यगाथा कलाकारांच्या मोठ्या संचातून नाट्य स्वरूपात जगासमोर आणली आहे. गोव्यातील रविंद्र भवन च्या माध्यमातून सर्व तालुक्यांत या नाटकाचे आयोजन करण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. गोवा मराठी अकादमी आणि रवींद्र भवन बायणा- वास्को यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व कलाशक्ती नृत्य संस्था कुठ्ठाळी- गोवा येथील १०० हून अधिक महिला कलाकारांचा समावेश असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'शिवगाथा' हे मराठी महानाट्य शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सभागृह रवींद्र भवन वास्को गोवा येथे पार पडले. मोफत प्रवेश असलेल्या या महानाट्याला गोमंतकातील हजारो मराठी प्रेमी उपस्थिती लावली होती. अशा कार्यक्रमांचे श्रेय गोवा मराठा अकादमीच्या कार्याला द्यावे लागेल.

   याशिवाय प्रत्येक तालुक्यात मराठी बालभवन, सांस्कृतिक केंद्र स्थापन करून मराठी संस्कृती टिकवण्यासाठी मराठी अकादमी कार्यरत आहे.

  गोव्यातील मराठी संस्कृती मराठी भाषा टिकवण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या गोवा येथील जागतिक मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेला गोव्याच्या राज्यभाषेचा दर्जा मिळावा. अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी सहमती दर्शवली असून गोवा राज्य सरकारने या कामी पुढाकार घ्यावा. अशी विनंती केली आहे. या अनुषंगाने 'गोवा मराठी अकादमीच्या' कार्य विस्तारासाठी शासकीय स्तरावरुन निधीची उभारणी करावी. अशी मागणीही गोव्यातील साहित्य व विविध कलाक्षेत्रातील कलाकार, विद्यार्थी, पालक व नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment