![]() |
| किंग कोब्राला पकडताना वन्यजीव रक्षक विकास माने. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा दि. ३०-१२-२०२५
चंदगड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या हेरे, मोटणवाडी ते पारगड मार्गावरील गुडवळे खालसा गावातील कॉलिटी चिकन कंपनी नजीक मुख्य रस्त्याजवळ तब्बल १० फूट लांबीचा किंग कोब्रा वनविभागाने वन्यजीव रक्षकांमार्फत पकडून सुरक्षित जंगलात सोडला.
रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ हा सुट्टीचा दिवस असल्याने मोटणवाडी ते पारगड रस्त्याला पर्यटकांची मोठी वर्दळ होती. ऐतिहासिक किल्ले पारगड कडे ये-जा करणाऱ्या काही पर्यटकांना गुडवळे गावच्या हद्दीतील कॉलिटी चिकन जवळ भला मोठा 'किंग कोब्रा' दृष्टीस पडला. काही वेळातच रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांनी तिथे गर्दी केली. त्याच वेळी तिथून जाणारे वनविभागाचे कर्मचारी शंकर तेरवणकर यांना ही गोष्ट निदर्शनास येताच सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी जमलेल्या पर्यटक व ग्रामस्थांना तिथून बाजूला केले. त्यांनी ही बाब वरिष्ठांना कळवल्यानंतर तिलारीनगर येथे वन्यजीव जनजागृती, तसेच पर्यटकांना निसर्ग मार्गदर्शन करणारे, वन्यजीव अभ्यासक विकास माने यांना पाचारण केले. माने यांनी काही वेळातच गुडवळे येथे येऊन या भल्या मोठ्या किंग कोब्राला शिताफिने पकडले. सुमारे दहा फूट पेक्षा अधिक लांबीच्या या सापाला वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, श्रीमती वर्षदा पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली माने व शंकर तेरवणकर यांनी राखीव जंगल क्षेत्रात रेस्क्यू केले.
किंग कोब्रा तथा नागराज जगातील सर्वात मोठा विषारी साप म्हणून ओळखले जातो. याची सर्वसाधारण लांबी १० ते १२ फुट तर अधिकतम लांबी १८ फूट एवढी असते. इंग्रजीत याला किंग कोब्रा असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव Ophiophagus kaalinga असून तो नागांच्या कुळात मोडत नाही, मात्र नांगांप्रमाणे फणा काढतो व आकाराने मोठा असल्याने याला 'किंग कोब्रा' नाव दिले गेले आहे. छोटे साप व इतर छोटे प्राणी हे याचे प्रमुख खाद्य असून तो भात शेती, जंगल परिसरात आढळतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा जगातील एकमेव असा साप आहे; ज्याची मादी शेपटीच्या सहाय्याने झाडाचा पाला गोळा करून त्याचा ढीग बनवते व त्यामध्ये अंडी घालून तब्बल २ महिने त्या ढिगावर बसून पिले बाहेर येईपर्यंत अंडी उबवते. अशी माहिती पर्यटक व ग्रामस्थांना वन्यजीव रक्षक विकास माने यांनी दिली.
गेल्या दोन वर्षात याच परिसरातील पार्ले येथे ढोलगरवाडी येथील सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी १२ ते १३ फूट लांब आकाराच्या किंग कोब्राला पकडून रेस्क्यू केले होते. कालच्या घटनेवरून या परिसरात किंग कोब्रांची संख्या अधिक असण्याची शक्यता वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांनी व्यक्त केली असून पर्यटक व ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले आहे.


No comments:
Post a Comment