चंदगड / सी एल वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील जन आधार दिव्यांग विधवा परितक्त्या निराधार संस्था, हलकर्णी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात, एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेले सूरज नारायण कांबळे आणि पुरस्कारप्राप्त कलाकार देवेंद्र कांबळे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
करंजगाव येथील रहिवासी असलेले सूरज नारायण कांबळे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत 'उद्योग निरीक्षक' पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण चंदगड तालुक्यात अभिमानाचे वातावरण आहे. या निमित्ताने संघटनेच्या संपर्क कार्यालयात त्यांचा पुष्पगुच्छ शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. "तुमचे यश हे केवळ तुमचे नसून प्रतिकूल परिस्थितीत लढणाऱ्या हजारो बांधवांसाठी एक आशेचा किरण आहे," अशा शब्दांत यावेळी मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. कला क्षेत्रातील योगदानाची दखल याच सोहळ्यात कालकुंद्री गावचे सुपुत्र आणि संघटनेचे संपर्क प्रमुख देवेंद्र मारुती कांबळे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांना मिळालेला 'बेळगाव जिल्हा कलारत्न सेवा पुरस्कार' हा त्यांच्या कलेप्रति असलेल्या निष्ठेचा गौरव आहे. एकाच व्यासपीठावर प्रशासकीय यश आणि कला क्षेत्रातील सन्मान असा दुग्धशर्करा योग यानिमित्ताने जुळून आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जोतीबा गोरल व आणाप्पा गोरल यांनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला आणि गुणवंतांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या सत्कार समारंभाने उपस्थित तरुणांमध्ये एक नवीन उत्साह संचारला होता. यावेळी उपाध्यक्ष संदीप पाटील, सचिव सतीश कांबळे, संजय परिट, मारुती सावंत, तुकाराम केसरकर, बसवानी कडोलकर, महादेव जाधव, नारायण कांबळे, देवेंद्र कांबळे, परशराम नाईक यांसह संघटनेचे पदाधिकारी, परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment