चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण परिसरात वन्यप्राण्यांची अवैध शिकार करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीविरोधात वनविभागाने मोठी व धाडसी कारवाई करत शिकारी साहित्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या थरारक कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वन्यप्राणी शिकारीविरोधातील वनविभागाच्या कणखर भूमिकेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री कानुर खुर्द येथून सडेगुडवळे गावाच्या हद्दीतील घटप्रभा धरण क्षेत्राजवळ वनविभागाचे पथक रात्र गस्त करत होते. दि. १३ डिसेंबर रोजी पहाटे सुमारे १२.३० वाजता पांढऱ्या रंगाची शेवरलेट बीट आणि पाठोपाठ ब्राऊन रंगाची रेनॉल्ट डस्टर ही दोन वाहने संशयास्पदरीत्या धरण परिसरात दाखल झाली.
वनविभागाच्या पथकाने तपासणीसाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता रेनॉल्ट डस्टर चालकाने गाडी थांबवण्यास नकार देत रिव्हर्स व नंतर भरधाव वेगाने पळ काढला. त्याचवेळी शेवरलेट बीट कारही दहशत माजवण्याच्या उद्देशाने भरधाव निघून गेली. वनविभागाच्या पथकाने सडेगुडवळे ते बेळगाव–वेंगुर्ला रस्त्यावर सुमारे २ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.
दरम्यान, सडेगुडवळे गावच्या हद्दीतील जळकी व्होळ या ठिकाणी रेनॉल्ट डस्टर कार शेतात घुसली. मात्र कारमधील इसम अंधाराचा फायदा घेत बंदूक घेऊन ऊसशेतात फरार झाले. आरोपींकडे बंदूक असल्याने तसेच अंधार व उंच ऊसामुळे त्यांना पकडणे शक्य झाले नाही.
त्यानंतर वनविभागाने रस्त्याकडेला अडकलेल्या रेनॉल्ट डस्टर कारची तपासणी केली असता बंदुकीची रिकामी केस, ४ जिवंत काडतुसे, मोठा सर्च लाईट, वायर, पाठीवरील बॅगा, दोरी, सु-या, सत्तूर, कटर, धारदार हत्यारे, मोबाईल फोन, हातमोजे असा मोठा शिकारी साहित्याचा साठा आढळून आला. या सर्व मुद्देमालासह संबंधित कार जप्त करण्यात आली असून एकूण मालमत्ता किंमत ५,२१,११५ रुपये इतकी आहे.
या प्रकरणी वन अपराध क्र. WL-01/2025 (दि. 13/12/2025) नोंदवण्यात आला असून तपासादरम्यान एकूण ११ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
🔴 निष्पन्न संशयितांची नावे पुढीलप्रमाणे :
1️⃣लखन शिवाजी हेगडे (रा. माणगाववाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
2️⃣ अन्वर इब्राहिम पटेल (रा. दानोळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
3️⃣ दिगंबर पांडुरंग अनगुडे (रा. कानुर खुर्द, ता. चंदगड)
4️⃣ इर्षाद नदाफ, रा. दानोळी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
5️⃣ बबलु नदाफ, रा. दानोळी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
6️⃣ दाऊद अजीज नदाफ (रा. दानोळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
7️⃣शाब्गीर दस्तगीर जमादार (रा. दानोळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
8️⃣ अक्षय हेगडे, रा. दानोळी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
9️⃣ तुकाराम महादेव अमृसकर (रा. कानुर खुर्द)
🔟 रियाज दस्तगीर जमादार (रा. दानोळी, ता. हातकणंगले)
1️⃣1️⃣ अमीन रहिमबक्ष मुजावर (रा. गंजीमाळ मानेनगर, रुकडी, ता. हातकणंगले)
यापैकी तुकाराम अमृसकर, रियाज जमादार व अमीन मुजावर यांना दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली. त्यांना मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी वर्ग-१, चंदगड (मा. व्ही. एस. अगरवाल) यांच्या न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकील श्रीमती निता चव्हाण यांनी सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली. न्यायालयाने आरोपींना १९ डिसेंबर २०२५ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली असून उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत चंदगड व कानुर खुर्द वनविभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
वन व वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन व जैवविविधतेचे जतन करणे अत्यंत आवश्यक असून, कुठेही अवैध शिकार, वृक्षतोड किंवा अतिक्रमण होत असल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन परिक्षेत्र वनअधिकारी, चंदगड यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे.

No comments:
Post a Comment