तिलारीघाट दुरुस्ती प्रश्नी दोन ऑगस्टमध्ये बांधकाम कार्यालयाला घेरावचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2019

तिलारीघाट दुरुस्ती प्रश्नी दोन ऑगस्टमध्ये बांधकाम कार्यालयाला घेरावचा इशारा

 तिलारी दोडामार्ग घाटात कोसळलेल्या रस्त्याजवळ बॅरेल उभे करून धोका टाळण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न.

चंदगड / प्रतिनिधी
वीस  दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे कोसळून नादुरुस्त झालेल्या तिलारी- दोडामार्ग घाट रस्ता दुरुस्ती काम चार दिवसात सुरू न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चंदगड येथील कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा किल्ले पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजप पक्षाचे शक्तीकेंद्र प्रमुख रघुवीर शेलार यांनी दिला आहे.जिओ केबल चर खुदाई मुळे कमकुवत झालेला तिलारी - दोडामार्ग घाट (रामघाट) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने पाच जुलै रोजी कोसळून सर्व प्रकारच्या वाहतुकीला धोकादायक बनला आहे .कोल्हापूर, बेळगाव, गडहिंगलज सह चंदगडला सिंधुदुर्ग व गोव्याशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून गणला जातो.  सध्या या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक खंडित झाली आहे. कोल्हापूर बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन महिनाभरात घाट रस्ता दुरुस्त करून वाहतुकीस खुला करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि गेल्या पंधरा-वीस दिवस पावसाने चांगली उघडीप देऊनही  घाट रस्ता दुरुस्तीची कोणतीच हालचाल दिसत नाही.याबाबत घाटाच्या दोन्ही बाजूकडील प्रवासी व वाहनधारकांतून  तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील भेडशी, कोनाळकट्टा, दोडामार्ग, घोटगेवाडी परिसर तसेच गोवा राज्यातील उत्तरेकडील भागातील नागरिक, विद्यार्थी, वैद्यकीय सेवा, शिक्षण, व्यापार, भाजीपाला, दूध यासह अनेक बाबतीत बेळगाव, गडहिंग्लज, चंदगड वर अवलंबून आहेत.  दोडामार्ग परिसरातील बरेच विद्यार्थी चंदगड, महागाव, गडहिंग्लज येथील महाविद्यालयात शिकण्यासाठी बस ने रोज ये-जा करतात त्यांचे शिक्षण ही एसटी बस वाहतूक खंडित झाल्यामुळे धोक्यात आले आहे. यात सर्वांचे अतोनात हाल होत आहेत. त्याचप्रमाणे महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थी उत्सवावेळी कोकणात जाणाऱ्या विद्यार्थी, चाकरमानी व उत्सव संबंधित खरेदीबाबत नागरिकांची मोठी कुचंबणा होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून घाट वाहतुकीसाठी तात्काळ निर्धोक करण्याची ची गरज आहे. तथापि आश्वासनानंतरही सर्वजनिक बांधकाम विभागाची वेळकाढू व उदासीन वृत्ती  दिसत आहे. ही मानसिकता सोडून रस्ता बांधणी काम युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण करावे. अशी मागणी करण्यात आली असून चार दिवसात दुरुस्ती काम हाती न घेतल्यास शनिवार दि.दोन ऑगस्ट रोजी दोडामार्ग, भेडशी, कोणाळकट्टा, घोटगेवाडी, मोरले आदी घाटाखालील गावांसह चंदगड, तिलारीनगर, पासून गडहिंग्लज परिसरातील त्रस्त नागरिकांना घेऊन बांधकाम विभागाच्या चंदगड कार्यालय व अधिकार्‍यांना घेराव आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते  रघुवीर शेलार यांनी दिला आहे. 


No comments:

Post a Comment