कल्लाप्पाण्णा भोगण-अनिता भोगण यांची अनोखी कोरोना जनजागृती मोहीम - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2020

कल्लाप्पाण्णा भोगण-अनिता भोगण यांची अनोखी कोरोना जनजागृती मोहीम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण व सरपंच सौ.अनिता भोगण यांनी ग्रामपचायतीच्या घंटागाडीतून जनजागृती केली. 
चंदगड / प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोवाड ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण गावात निर्जतुकीकरणाची फवारणी, कोरोना आजारविषयी सजगता येण्यासाठी घरोघरी जाऊन सचित्र माहितीपत्रके,  तसेच या जीवघेण्या रोगाचं गांभीर्य मनावर ठसवणारी हाक सरपंच सौ. अनिता भोगण व जि. प. सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण यांनी गल्लीबोळात, घराघरात पोचवली आहे.
माध्यम आहे ग्रा.प.च्या कचरा वाहतूकीच्या घंटागाडीचे. या गाडीचं ड्रायव्हिंग स्वतः कल्लाप्पाण्णा करत आहेत तर सरपंच अनिता भोगण ध्वनीक्षेपकावरुन सर्वांना कळकळीची विनंती करीत आहेत. 
पुण्या-मुंबईवरुन या परिसरातील रोज चार-पाचशे चाकरमानी गावी परतत आहेत. एकट्या कोवाड येथील पीएचसीवर याचा प्रचंड ताण पडत आहे. खाजगी डाॅक्टर्सनी सेवाभावी वृत्ती जीवंत ठेऊन रोज दोन पीएचसीमध्ये सेवा पुरवावी यासाठी भोगण यांनी चंदगड तालुका मेडिकल असोशिएशन व वरिष्ठ पातळीवर संपर्क यंत्रणा राबवली आहे. 
कोवाड बाजारपेठेत दररोज कोटींची उलाढाल होते. गेले चार दिवस शंभर टक्के बाजारपेठ बंद आहे. शेतकरी- कष्टकरी यांनीही उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यु पाळला. कोवाडच्या सर्व सीमांना नाकेबंदी करण्यात आली आहे. यासाठी गावातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने नाकेबंदीसाठी पोलिसांना सहकार्य केले आहे. कोवाड बाजारपेठातील गरजा भागविताना  काही बाहेरील प्रवासी चोरट्या मार्गाने वावरताना दिसल्यास त्याचा प्रतिबंध करण्यासाठी स्वयंसेवी संघटना कार्यरत आहेत. या कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि कोवाड प्रमुख ठिकाण असल्याने कोणीही रक्ताच्या अगर पाहुण्यांच्या नातलगांना विनाकारण बोलाऊन घेऊ नये असेही आवाहन करण्यात आले आहे. बाहेरुन आलेल्यांना स्वतःची आरोग्यतपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. गरज पडल्यास बाहेरुन आलेल्या प्रवाशांसाठी माळावर राहुट्या उभारण्याचा विचार असल्याचे कल्लाप्पाण्णा भोगण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment