माजी सैनिकांनी तरुणांमध्ये देशसेवेचे बीज रुजवावे - पत्रकार निवृत्ती हारकारे यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2020

माजी सैनिकांनी तरुणांमध्ये देशसेवेचे बीज रुजवावे - पत्रकार निवृत्ती हारकारे यांचे आवाहन

सुंडी येथे तानाजी टक्केकर यांचा नागरी सत्कार संपन्न.
 सेवानिवृत्त माजी सैनिक तानाजी टकेकर यांचा नागरी सत्कार करताना मान्यवर.
मजरे कार्वे / प्रतिनिधी
सीमेवर देश सेवा बजावून सेवानिवृत्त होऊन स्वगृही परतणाऱ्या माजी सैनिकांनी तरुण पिढीमध्ये देशसेवेचे ब्रिज रुजवावे. गावागावांमध्ये राजकारणाने पोखरलेल्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे काम करावे. असे प्रतिपादन पत्रकार निवृत्ती हारकारे यांनी व्यक्त केले. सुंडी (ता. चंदगड) येथील माजी सैनिक तानाजी टकेकर यांच्या नागरी सत्कार व षष्ठीपूर्ती सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी लेफ्टनन कर्नल शिवाजीराव बाबर होते. 
स्वागत व प्रास्ताविक एन. एम. पाटील यांनी केले. निवृत्ती हारकारे पुढे म्हणाले, राजकारणाचा वापर करून तरुणांची माथी भडकवली जात आहेत.  तरुण यात वाहवत निघाले आहेत. आमच्या तरुणांकडे भरपूर गुणवत्ता आहे. मात्र त्याचा उपयोग समाजासाठी व देशासाठी होणे गरजेचे आहे. शाळेच्या परीक्षेमध्ये पास होण्याबरोबरच जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे शिक्षण त्यांना देणे गरजेचे आहे. आज सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक हाल-अपेष्टा सहन करून सेवा बजावीत आहेत। ते देशाच्या सीमेवर आहेत म्हणून आपण आनंदात राहू शकतो. म्हणून सर्वांनीच जेवताना शेतकऱ्याचे व झोपतांना सैनिकांचे आभार मानायला विसरू नका असे आवाहनही त्यांनी केले.
सेवानिवृत्त माजी सैनिक तानाजी टक्केकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने व त्यांच्या  युनिट च्या वतीने भव्य नागरी सत्कार यावेळी संपन्न झाला. यावेळी शहीद जवानांच्या वीरपत्नी श्रीमती रूपा महादेव तुपारे, श्रीमती शर्मिला राजेंद्र तुपारे व श्रीमती मंजुश्री संभाजी टक्केकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. लेफ्टनंट कर्नल शिवाजीराव बाबर म्हणाले, आज अखेर १८० सैनिक या गावाने देशसेवेसाठी दिले आहेत. चंदगड मधून येणाऱ्या प्रत्येक तरुणांच्या चेहऱ्यावर तेज व देशसेवेचे व्रत नेहमी दिसत असे. याहीपुढे देशाच्या सेवेसाठी तरुणांनी पुढे आले पाहिजेत. यावेळी प्रकाश पाटील, तुकाराम कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास सरपंच सौ. शिल्पा मुतकेकर, बळीराम पाटील, धोंडीबा हळदकर, विठ्ठल पाटील, दत्तू पाटील, शाहू पाटील, रमेश बोकडे, रामू कोकीतकर, कृष्णा मोरे, सौ गीता टक्केकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. आभार अरविंद भातकांडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment