तुर्केवाडी (प्रतिनिधी) :
कोरोनाच्या संकटात वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वच घरी आहेत. अशात गावातील मजुरीवर काम करणाऱ्या अनेक कुटुंबांचे लॉकडाऊनमुळे होत असलेले हाल काही तरुणांना बघवले नाहीत. मग काय, व्हाट्स ऍपच्या माध्यमातून काही तरुणांनी एकत्र येत 'सेवार्थ फाऊंडेशन' स्थापन करुन मदतीचा निर्धार केला. यातील काही तरुण बाहेर कामाला आहेत, तर काहींना गावातील परिस्थितीचा चांगला अंदाज आहे. याच माहितीतून तुर्केवाडी गावातील जवळपास ५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. मुख्य म्हणजे कोणताही बडेजाव किंवा प्रसिद्धी न करता सेवाभावातून हे काम केले आहे. याच दरम्यान, काही कुटुंबांची खडतर परिस्थितीची जाणीव झाल्याने या तरुणांनी आता संपूर्ण कुटुंबच वर्षभरासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्केवाडी गावातील सर्व गावगाडा ठप्प असतांना निराधारांचा विचार करुन काहीतरी करु पाहणाऱ्या या तरुणांनी गावातील सर्वांसमोरच एक आदर्श निर्माण केला आहे.
एकीकडे कोरोनाची दहशत वाढत असतांना लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व व्यावसाय, उद्योग बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. रोजंदारी किंवा मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांसमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यांचे हाल पाहवत नसल्यानेच गावातील तरुणांनी एकत्र येत सेवार्थ फाऊंडेशनच्या माध्यामातून स्तुत्य उपक्रम हातात घेत मदत देऊ केली. यादरम्यान, मोल-मजुरी करुन जगणाऱ्या या कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. त्यामुळे बर्षानुवर्षांच्या गावगाड्यातील राजकारणाला आणि भेदभावाला थारा न देता तरुणांनी एका सामाजिक बांधिकलकीतून समाज सेवेचे वृत हातात घेतल्याने सार्व सामान्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
सेवार्थ फाऊंडेशन फक्त कुटुंबांनाच मदत करुन न थांबता कोरोनाच्या युद्धात खऱ्या अर्थाने मैदानात लढणारे ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोरोना दक्षता कमिटीचे सदस्य यांनाही सॅनिटायझरचे वाटप केले. त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.
या सेवाकार्यात गावातील अनेकांनी सढळ हाताने मदत केली आहे. तर बाहेरील काही मंडळींना व्हाट्सअपच्या माध्यमातून माहिती मिळताच स्वतःहून आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. तरी यापुढेही गावाच्या समाजकार्यात सेवेचे वृत असेच सुरु ठेवण्याचा निर्धार यावेळी सेवार्थ फाऊंडेशनचे सदस्य पांडूरंग जाधव, संतोष कदम, जोतिबा पाटील, विनोद पाटील, सुरज सुतार, साई भोसले, रानबा कांबळे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment