सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांची माहिती देणारी मालिका - भाग - ९ प्रश्नोत्तरे / शंकासमाधान - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2020

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांची माहिती देणारी मालिका - भाग - ९ प्रश्नोत्तरे / शंकासमाधान

                                       

भाग ९ : प्रश्नोत्तरे / शंकासमाधान

प्रश्न :- साप डूख धरतो हे खरे आहे का?
उत्तर :- नाही! साप डूख धरत नाही. त्याला स्मरणशक्ति नसल्यामुळे तो कोणतीही घटना अथवा एखादी व्यक्ती लक्षात ठेवू शकत नाही. तथापि सर्पांच्या मिलन काळात नागिन अथवा मादी एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडत असते. अशावेळी आपण त्या परिसरातून गेलो किंवा त्या नागिन / मादीला काठीने मारण्याचा प्रयत्न केला तर तो गंध आपल्या चप्पल किंवा काठीला लागतो. अशी वस्तू आपण घरात घेऊन गेलो तर त्या परिसरात असलेले इतर साप त्या वासाने आपल्या घरात येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला वाटते की आपण सापाला दुखवले म्हणून तो डूख धरून आपल्या घरापर्यंत आला. त्यामुळे साप डूख धरतो हे म्हणणे चुकीचे आहे.

प्रश्न :- सापाने दंश केलेल्या व्यक्तीला मांत्रिकाकडे न्यावे काय?
उत्तर :- सापाच्या विषावर प्रतिविष (anti venom injection) हे एकमेव आणि रामबाण औषध सध्या उपलब्ध आहे. हे सर्वच सापांच्या विषापासून बनवले असल्यामुळे ते कोणत्याही विषारी सापाचा दंश झाल्यास एकमेव औषध आहे. म्हणून सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवावे. आपल्या देशात जे सर्पदंश होतात त्यातील ७०/८० टक्के दंश बिनविषारी सापांचे असतात. मांत्रिक लोक आपल्याकडे आलेल्या सर्पदंश रुग्णाला उपचाराचे नाटक करतात. बिनविषारी साप चावल्यामुळे रुग्णाला काही होत नाही. लोकांना वाटते की मांत्रिकाकडे गेल्यामुळे आपण ठीक झालो. पण हे चुकीचे आहे. दुसरीकडे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मंदिरात कोंडून ठेवले की त्याचे विष उतरते असा एक समज आहे. ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे. असे केल्यास विषारी सर्पदंश झालेल्या व्यक्तीस वेळेत उपचार न होऊन त्याचा मृत्यू ओढवण्याची शक्यताच जास्त असते.

प्रश्न :- सापाचे वयोमान किती वर्षे असते?
उत्तर :- कोणत्याही प्रकारच्या सापाचे जास्तीत जास्त वयोमान पंचवीस वर्षे असते. त्यामुळे एखाद्या मंदिरात एकच साप वर्षानुवर्षे दिसतो म्हणणे चुकीचे आहे.

प्रश्न :- सापाला दररोज आहाराची गरज असते काय?
उत्तर :- नाही कोणताही साप दररोज आहार घेत नाही. एकदा पुरेसा आहार घेतल्यानंतर त्याला किमान आठ दहा दिवस दुसरा आहार घेण्याची गरज नसते.

सौजन्य :- प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख ढोलगरवाडी व शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :- मा. तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक सर्पोद्यान ढोलगरवाडी.
सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

**शब्दांकन* :- श्रीकांत वै. पाटील,* कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.Mo. 9552040015.
No comments:

Post a Comment