चंदगड तालुक्यात पावसाचा जोर वाढला, २३ पैकी ९ प्रकल्प झाले ओव्हर फ्लो - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2020

चंदगड तालुक्यात पावसाचा जोर वाढला, २३ पैकी ९ प्रकल्प झाले ओव्हर फ्लो


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
         चंदगड तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे यामुळे चंदगड तालुक्यातील एकूण २३ पैकी ९ प्रकल्प
व्हरफ्लो झाली आहेत. आज मंगळवार सकाळी आठ वाजेपर्यंत च्या २४ तासात तालुक्‍यात सरासरी केवळ ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तीन मध्यम व २० लघुपाटबंधारे प्रकल्पांत ८९.३५ टक्के साठा झाला असून पाणीपातळीत वेगाने वाढ सुरू आहे. यातील घटप्रभा- फाटकवाडी व झांबरे-उमगाव हे दोन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने ८ जुलै पूर्वीच भरले असून जंगमहट्टी ७३ टक्के भरला आहे. लघुपाटबंधारे पैकी जेलुगडे, कळसगादे, सुंडी,किटवाड नं १, किटवाड नं २ व पाटणे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित लघुपाटबंधारे प्रकल्पापैकी आज अखेर झालेला पाणीसाठा आंबेवाडी ८७.२८, दिंडलकोप- ९७.७३, हेरे- ७४.६६, करंजगाव- ४३.६०, खडक ओहोळ- ३९.७०, लकीकट्टे- ८२.२०, कुमरी ५९.७०, निटुर नं.२- ५३.२४, काजिर्णे- ९४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. याशिवाय चंदगड तालुक्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या अन्य चार लघु तलावातील आजचा पाणीसाठा पुढील प्रमाणे; निट्टूर नं. १- ६०.६०, मलतवाडी- ६४.३३, कुदनुर- ९९ टक्के तर हलकर्णी तलाव १०० टक्के भरला आहे.
         तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर पावसाचा जोरही वाढत आहे. मंगळवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस, कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. चंदगड ९३ (१२४९), नागणवाडी ८९ (१०४८), माणगाव २२ (२९४), कोवाड ३४ (५१९), तुर्केवाडी ८८ (९९१), हेरे १०९ (२००५), चोवीस तासातील एकूण पाऊस ४३५ तर सरासरी पाऊस 72 मिमी. झाला आहे. आज अखेर तालुक्यातील एकूण पाऊस ६१०७ तर सरासरी पाऊस १०१७ मिलिमीटर इतका झाला आहे. तालुक्यात आज हेरे मंडलात सर्वाधिक तर माणगाव मध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस शिवारातील सर्वच पिकांना पोषक ठरत असला तरी वाऱ्यामुळे ऊस पीके भुईसपाट होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
          गतवर्षी चार ऑगस्टपासून पावसाने तालुक्यात थैमान घातले होते त्याचीच पुनरावृत्ती या वर्षी पुन्हा होईल काय याची चिंता तालुका वासियांना लागून राहिले आहे.


No comments:

Post a Comment