वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १४ (बिनविषारी साप) गवत्या (Green Keel back ) - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १४ (बिनविषारी साप) गवत्या (Green Keel back )

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका, भाग : १४ (बिनविषारी साप) गवत्या
                                गवत्या (Green Keel back) 
कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर असे आहे. महाराष्ट्रात गवत्या या नावाने परिचित असणारा हा बिनविषारी साप आहे. समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ भागात राहणारा असला, तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. हिरवे गवत व झुडपांमध्ये असतो पण घरांच्या आसपास सुद्धा सापडतो.
गवत्या सापाच्या नराची सरासरी लांबी  ६० सेंमी., तर मादीची ९० सेंमी. असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर उंचवटा  असल्यामुळे ती खरखरीत असते. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लांबीला कमी असते. याचा रंग हिरवा, पोपटी, कधी कधी तपकिरी असतो. पोटाचा रंग काळसर पांढरा (राखाडी) किंवा पिवळसर तसेच हिरवट पांढरा असतो. गवत व झाडाझुडुपांशी मिळताजुळत्या रंगामुळे गवत व झुडपातून तो सहजासहजी दिसून येत नाही. तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही.
 बेडूक, विविध किटक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण गोगलगायी किंवा लहान पक्षी ही खातो. त्यांचा मीलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर मध्ये यातून पिल्ले बाहेर पडतात.
गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो, क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून याला हिरवा नाग असेही संबोधले जाते. गवत्या साप भारतात सर्वत्र आढळतो.

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

*शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२*

No comments:

Post a Comment