वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १६ (बिनविषारी साप) कवड्या Wolf snake (lycodon aulicus) - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १६ (बिनविषारी साप) कवड्या Wolf snake (lycodon aulicus)

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका 
(बिनविषारी साप) कवड्या Wolf snake (lycodon aulicus)

 सापांबद्दल अधिक माहिती नसणारे लोक बिनविषारी कवड्या सापाला विषारी मण्यारच समजतात.  कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या कोल्युब्रिनी या उपकुलात समावेश असलेल्या कवड्या या बिनविषारी सापाचे शास्त्रीय नाव लायकोडॉन ऑलिक्स आहे. हा भारत आणि श्रीलंकेत सर्वत्र आढळतो. अंदमान निकोबार द्वीप समूह, मलाया, इंडोचायना आणि फिलिपीन्स बेटांतही तो सापडतो. सपाट प्रदेशांत तो सगळीकडे आढळणारा कवड्या फार उंच ठिकाणी सापडत नाही.
घराभोवतालचा परिसर, बाग काही वेळा घरात व गुरांच्या गोठ्यातही दृष्टीस पडतो. दाट वस्तीच्या जागीही तो आढळतो. पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र सर्रास दिसतोच. हा साप निशाचर असल्यामुळे दिवसा एखाद्या आडोशाच्या जागी - पडीक भिंतीतल्या भेगा, दगड आणि विटा यांचे ढीग, गोठ्यातील चाऱ्याचे ढिगारे, जमिनीतली बिळे इत्यादींमध्ये-लपून बसतो आणि रात्री भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. उंदीर, सरडे, पाली इत्यादी त्याचे खाद्य आहे. 
 याची लांबी सरासरी ६०-७५ सेंमी असते. शरीर बारीक आणि किंचित चपटे असून शेपूट निमुळते व आखूड असते. कवड्या सापाचा रंग तपकिरी, फिक्कट तपकिरी ते गडद तपकिरी असतो. क्वचित काळ्या रंगाचा एखादा साप आढळतो. पाठीवर पांढरट किंवा पिवळसर पांढऱ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. मानेभोवती याच रंगाचे वलय असते. आडवे पट्टे डोक्याजवळ सुरू होऊन पुढच्या भागात ते स्पष्ट असतात. शेपटी कडील बाजूस अस्पष्ट होत जातात.  पट्ट्यांची संख्या ९ ते १८ पर्यंत असते पण अजिबात पट्टे नाहीत असे शक्यतो होत नाही. पोटाचा रंग पांढरा किंवा पिवळसर पांढरा असतो.
खालच्या व वरच्या जबड्यांवरील पुढचे दात बरेच मोठे असतात. डोळे काळेभोर आणि बाहुली उभी असते.
कवड्या साप चपळ असून झाडांवर व इतर उंच ठिकाणी सहज चढतो. माणसांची चाहूल लागताच दूर पळण्याचा प्रयत्न करतो पण अडथळा केला किंवा पकडण्याचा प्रयत्न केला, तर चिडून कडकडून चावतो. मात्र हा पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याचा दंश घातक नाही.
याची मादी फेब्रुवारी ते जुलै महिन्यात एकावेळी चार ते सात अंडी घालते.  अंड्यांतून बाहेर पडणारी पिल्ले १५-१८ सेंमी. लांब असून रंग व शरीरावरील पट्ट्यांच्या बाबतींत हुबेहूब प्रौढांसारखी असतात.
काही लोक या सापाला चुकीने मण्यार समजतात; पण मण्यारचे पट्टे डोक्याच्या मागे काही अंतरावर सुरू होतात आणि ते शरीराच्या मागच्या भागात ठळक असून शेपटीच्या टोकापर्यंत असतात. हे लक्षात घ्यावे.


माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  


सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

*शब्दांकन/संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२


No comments:

Post a Comment