पत्रकारांसाठी बेड राखीव ठेवण्याच्या मागणीला प्रशासनाकडून अनेक जिल्हयात सकारात्मक प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2020

पत्रकारांसाठी बेड राखीव ठेवण्याच्या मागणीला प्रशासनाकडून अनेक जिल्हयात सकारात्मक प्रतिसाद

मुंबई / प्रतिनिधी
          कोविड-19 ने बाधित होणार्‍या पत्रकारांची वाढती संख्या आणि रूग्णालयांमध्ये उपचारासाठी गेलेल्या पत्रकारांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन रूग्णालायांत पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषेने केल्यानंतर या मागणीस विविध जिल्हयातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.अलिबाग येथील जिल्हा शासकीय रूग्णालायत पत्रकारांसह सर्वच कोरोना यौध्दयांसाठी एक बेड राखीव ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी जाहीर केले आहे.
          या बेडला व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजनची व्यवस्था असेल मात्र रायगड जिल्हयातील रूग्णांची संख्या लक्षात घेऊन किमान पाच बेड राखीव ठेवावेत अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव विजय मोकल आणि रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे यांनी केली आहे.
            बीड जिल्हयातही अशी व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मान्य केले आहे.काल मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन,कार्यकारिणी सद्सय अनिल वाघमारे आणि इतर पत्रकारांंनी धारूर येथे रेखावार यांची भेट घेऊन त्यांना ही मागणी केली.त्यावर त्यांनी सकारात्म प्रतिसाद दिला.नांदेड जिल्हा पत्रकार संघानेही विभागीय सचिव प्रकाश कांबळे आणि जिल्हा अध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या संदर्भातली मागणी केली आहे.वाशिम येथेही परिषदेचे माजी अध्यक्ष माधवराव अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली याच मागणीसाठी परवा आंदोलन करून पत्रकारांना राखीव बेड असावेत अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.सांगली येथे परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन पत्रकारांसाठी राखीव बेड असावेत अशी मागणी केली असून आजपासून तेथे ही व्यवस्था सुरू होईल अशी अपेक्षा आहे.पुणे येथील पत्रकारांनी देखील काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन पत्रकारांना प्राधांन्याने रूग्णालायत उपचार व्हावेत असा आग्रह धरला त्यानीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून पत्रकार विम्याबाबतचा निर्णय येत्या कॅबिनेटमध्ये घेतला जाईल अशी  अपेक्षा व्यक्त केली आहे.अन्य जिल्हयातील पदाधिकार्‍यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरावा असे आवाहन एस. एम. देशमुख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment