वन्य प्राण्यांना करंट देणारे कुंपण लावण्याच्या वन विभागाला सूचना..! उपमुख्यमंत्री अजित पवार, अडकूर येथे भव्य नागरी सत्कार प्रसंगी प्रतिपादन - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2025

वन्य प्राण्यांना करंट देणारे कुंपण लावण्याच्या वन विभागाला सूचना..! उपमुख्यमंत्री अजित पवार, अडकूर येथे भव्य नागरी सत्कार प्रसंगी प्रतिपादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करताना आमदार राजेश पाटील, सोबत ना. हसन मुश्रीफ व मान्यवर.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

      चंदगड तालुक्यात हत्ती, रानगवे, वनगाई, रानडुकरे यांच्या कळपांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ही स्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. वन्य प्राण्यां पासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी जंगली जनावरांना करंट देणारे कुंपण लावण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या असून याबाबतचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदगड तालुक्यातील अडकूर येथे केले. चंदगड तालुक्याच्या विकासासाठी केवळ दोन वर्षात १६०० कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित त्यांच्यासह मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व जनसमुदाय
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते. स्वागत शिवाजी नांदवडेकर यांनी केले तर प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी केले. यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले २०१९ मधील अतिवृष्टीमुळे फाटकवाडी प्रकल्पाला गळती सुरू झाल्याने २० गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी २४ कोटी रुपयांचा निधी तात्काळ दिला. या पुढील काळात मत्स्य शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला उद्योगाचा दर्जा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजेश पाटील पराभूत झालेले असतानाही ते माझ्याकडे नेहमी अनेक कामे घेऊन येतात. तुम्ही पराभूत झालाय थोडे दिवस विश्रांती घ्या लोकांना कामे रखडली म्हणजे काय होते ते कळू दे..! असे म्हटले तरी त्यांची मतदारसंघातील जनतेच्या कामाबद्दलची तळमळ त्यांना शांत बसू देत नाही. त्यांना पराभूत करून चंदगड मतदार संघातील मतदारांनी फार मोठी चूक केली आहे. सोळाशे कोटींची कामे करूनही तुम्ही घड्याळाचे बटन दाबला नाही. त्यामुळे मी तुमचा फेटा यावेळी स्वीकारणार नाही! असे म्हणून त्यांनी व्यासपीठावर बांधण्यासाठी आणलेला फेटा बांधून घेण्यास नकार दिला. पुढील निवडणुकीत राजेश पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केले यावेळी समोर उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाने हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला.

       आपल्या महायुती काळात नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या सहकार्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. नुकतीच जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय देण्यास मदत होईल. तसेच सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. यामुळे खत व पाण्याच्या वापरात ५० टक्के बचत होते. तर उत्पादनात ५० ते  ६० टक्के वरून १०० टक्के पर्यंत वाढ होत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार कैलासवासी नरसिंगराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती वेळी मुंबई महाराष्ट्रात राहावे यासाठी अनेक हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. तथापि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी हा मराठी बहुभाषिक भाग कर्नाटकात डांबण्यात आलेला आहे. हा सीमा भाग महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे. तो महाराष्ट्रात आल्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होणार नाही. सीमा तंटा सध्या सुप्रीम कोर्टात असल्यामुळे सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्राच्या बाजूने निकाल लावून आणण्यासाठी आपण कमी पडणार नाही. अशी ग्वाही त्यांनी दिली.
   लाडक्या बहिणींच्या पाठिंब्यावरच महायुतीचे २३७ आमदार निवडून आले.  त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. अर्थसंकल्प सादर करताना साडेसात लाख कोटी बजेट पैकी नोकरदारांचे पगार, पेन्शन यावर  साडेतीन लाख कोटी खर्च होतो. शेतकऱ्यांच्या वीज माफीसाठी २० हजार कोटींचा तर लाडक्या बहिणींना ४५ हजार कोटी कोटी देतो. शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी २० हजार कोटींची वीज बिले माफ केली आहेत.
चंदगड मधील ऊसाला उताऱ्यावर आधारित किमान चार हजार रुपये प्रति टन भाव मिळाला पाहिजेत. यासाठी कारखाने पण जास्त दिवस चालले पाहिजे. केंद्र शासनाचा इथेनॉल उद्योगाला चालना देण्याचे धोरण सध्या राबवले जात आहे असे त्यांनी सांगितले.
   वाया जाणाऱ्या काजू बोंडांपासून एनर्जी ड्रिंकचे कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काजू उद्योगाला अडीच टक्के जीएसटी परतावा दिला आहे. काजू आणि साखर उद्योगांना आम्ही चांगले बळ देणार आहोत. चंदगडला काजूला नैसर्गिक आणि पोषक वातावरण आहे. देशात सर्वात चविष्ट काजू चंदगड आजरा भागातील आहे. त्यामुळे काजूचे ब्रॅण्डिंग व्हावे यासाठी सरकार तुमच्या पाठीशी राहील.
       यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राजेश पाटील  यांनी १६०० कोटी रुपयांची विकास कामे करूनही कोल्हापूर जिल्ह्यात युतीचे सर्व उमेदवार निवडून आले असताना केवळ चंदगड मधील उमेदवार राजेश पाटील यांच्या रूपाने पराभव झाला याचे सर्वाना शल्य आहे. यावरून   'गड आला पण सिंह गेला'  अशी खंत व्यक्त करत चंदगडच्या विकासासाठी आपण हिमालयासारखे उभे राहू अशी ग्वाही दिली.
    यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, भिकू गावडे, शितल फराकटे, भरमाना गावडे, अनिल साळुंखे, रामापा करिगार, भैय्या माने, नितीन दिंडे, तानाजी गडकरी, बाबासाहेब पाटील मुगळीकर यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आर डी पाटील यांनी केले. अभय देसाई यांनी आभार मानले.

विकास कामांचे लोकार्पण करायला वेळ कमी पडत आहे...! राजेश पाटील

   यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात सोळाशे कोटींहून अधिकची विकास कामे केली आहेत. गेल्या सहा महिन्यात ही कामे पूर्णत्वास गेली आहेत तर काही जात आहेत त्यांचे लोकार्पण करायला आपल्याला दिवस कमी पडत आहेत इतकी कामे आपण केली आहेत असे छातीठोकपणे सांगितले. या पुढील काळात अधिक जोमाने काम करून पुढच्या निवडणुकीत चंदगड मधून दोन आमदार दिसतील अशी गर्जना केली.

No comments:

Post a Comment