ग्रामीण कलाकारांचे व्यासपीठ चंदगडचे "झी केसरी प्रोडक्शन" - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2021

ग्रामीण कलाकारांचे व्यासपीठ चंदगडचे "झी केसरी प्रोडक्शन"

झी केसरी प्रोडक्शनचे चंदगड तालूक्यातील स्थानिक कलाकार

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील ग्रामीण कलाकारांच्या कलागुणांनी बहरलेली आणि या सर्वांच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी कोरली जावी अशी एक अविस्मरणीय घटना म्हणजे "झी केसरी प्रोडक्शन". या प्रोडक्शनच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील बरेच छोटे-मोठे हौशी कलाकाराना अभिनयाची संधी मिळत आहे.

        वर्षातून एकदा गावातील यात्रेमधून होणाऱ्या नाटकांमधून हे ग्रामीण कलाकार आपली कला सादर करीत असत. बऱ्याच कलाकारांचे स्वप्न असते की आपण ही मालिका चित्रपटांमधून काम करावे. पण ही सोय आपल्या ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने अर्थातच कलाकारांना शहरात जावे लागते. आज या घडीला कलाकारांची संख्या सुद्धा खुप वाढली आहे. तिथं सामान्य कलाकारांना कोण विचारणार? आणि आता म्हणावे तितके मालिका आणि चित्रपटात काम करणे सहज सोपे राहिलेले नाही. यासाठी खूप मेहनत तर करावीच लागते. पण आपल्या नशिबाचा सुद्धा भाग असतो हे कलाकारांना  आवर्जून सांगावेसे वाटते. 

         अशा या ग्रामीण कलाकारांना एकत्र करून "झी केसरी प्रोडक्शन" ची स्थापना केली गेली. झी प्रोडक्शनच्या माध्यमातून शॉर्टफिल्म लघुपट, वेबसिरीज व व्हिडिओ गाणी तयार करून कलाकारांना कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरात पोहोचविण्याचे कार्य चंदगड तालुक्यातील मुरकुटेवाडी गावचे हरहुन्नरी कलाकार लेखक व दिग्दर्शक शशिकांत विलास पेडणेकर यांनी केली आहे. चित्रपट व मालिकांची लहानपणापासूनच त्यांना खूप आवड होती. आजपर्यंत त्यांनी कविता, कथा, चित्रपट, एकांकिका आणि तमाशाप्रधान नाटके लिहिली आहेत. आज ते आखिल भारतीय महामंडळाचे सदस्य असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार, निर्माते व दिग्दर्शक यांच्याबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. 

      आज पर्यंत शॉर्टफिल्म, वेबसिरीजच्या माध्यमातून "झी केसरी प्रॉडक्शनने" आपल्या निर्मितीतून चंदगडी कलाकार, चंदगडी भाषा व चंदगड तालुक्यातील निसर्गरम्य वातावरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे. झी केसरी प्रोडक्शनने आज पर्यंत प्रीत माझी अधुरी, दिसं उगवलं बळीराजाचं, शर्यत, जबाबदारी, बाळूमामासाठी त्याग नातीचा, दर्शन घडवलं विठूरायाचं, माणसाची राख, साज ह्यो तुझा आणि सध्या चालू असलेले चित्रीकरण 'माझ्या दिलाची परी' ही धम्माल वेबसिरीज असे अनेक शॉर्टफिल्म आणि वेबसिरीज बनवले आहेत.या सगळ्यात आमच्या सर्वांचा तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

              सुरुवातीच्या लाॅक- डाऊन च्या काळात प्रॉडक्शनने आपल्या  झी केसरी च्या माध्यमातून ऑनलाईन अभिनय, रांगोळी,चित्रकला, भाषण अशा अनेक स्पर्धा आयोजित करून प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलंआहे. या प्रत्येक स्पर्धेसाठी आज पर्यंत मिलिंद गवळी (आई कुठे काय करते), मिलिंद दास्ताने(तुझ्यात जीव गुंतला),प्रेमा किरण,जगन्नाथ निर्वगुणे(लक्ष), किरण ममाने(मुलगी झाली हो) सुशांत शेलार,नीलेश चव्हाण(लागीर झालं जी) असे अनेक दिग्गज कलाकारांनी स्पर्धेचे परीक्षण केले आहे.त्यामुळे ग्रामीण कलाकार स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतो.तसेच विविध  सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुनील गोडबोले,भूषण कडू, सिद्धेश्वर झाडबुके अशी अनेक नामांकित कलाकार मंडळी या चंदगड नगरीत येऊन गेलेली आहेत. तसेच अनेक कलाकार आपले स्वानुभव आणि मार्गदर्शनाचे सल्ले या ग्रामीण कलाकारांसाठी संदेश फोन द्वारे पोहोचवत असतात जेणेकरून अशा अनेक कलाकारांचा उत्साह द्विगुणीत होऊन चांगल्या रीतीने काम करू शकतील.

No comments:

Post a Comment