पुण्यतिथी विशेष - अपरिचित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ! - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2021

पुण्यतिथी विशेष - अपरिचित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक !

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

     स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक युग म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. देशावरती राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना हाकलून दिल्याशिवाय देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही. देशामध्ये सामाजिक आणि इतर सुधारणा होणार नाहीत हे टिळकांनी ओळखलं होतं. आणि त्याच दृष्टीने स्वराज्याचा मंत्र देऊन त्यांनी राजकारणाची चतुःसूत्री आखली होती. त्याच जोरावरती देशांमध्ये राष्ट्रीयत्वाची लाट निर्माण झाली होती. टिळकांनी भारताचे औद्योगिक धोरण, शैक्षणिक धोरण, परराष्ट्र धोरण, आर्थिक शेतीविषयक धोरणांमध्ये कोण कोणते महत्त्वाचे बदल करायचे हे मुद्दे ठरू शकतात हे वेळोवेळी प्रतिबिंबीत केलं होतं. आज टिळकांना जाऊन १०१ वर्ष पूर्ण होत आहेत पण आजही टिळक अपरिचित लोकमान्य!

         स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारचं ! अशी सिंहगर्जना असो की कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर मी पाय ठेवेन, आणि मी लढेन अशी ललकारी असो. हे ऐकलं तरी स्वाभाविकच डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याचं. पण लोकमान्यांचं हे कर्तृत्व आणि कार्य या पलीकडे फार  थोड्याफार जणांनाच परिचित आहेत. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज वर न उघडलेले परिचित लोकमान्य ...!

       रत्नागिरीत लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला. त्यांचं मूळ नाव केशव. परंतु ते बाळ म्हणूनच सर्वज्ञात झाले . लोकमान्यांचे आजोबा रामचंद्र हे गावचे खोत. संस्कृत, विद्वान म्हणून त्यांची ख्याती होती. पण टिळकांचे वडील गंगाधरपंत टिळक आणि आई पार्वतीबाई, गुरुजी असलेल्या गंगाधरपंतांची पुण्यामध्ये बदली झाली, तेव्हा टिळक दहा वर्षाचे होते. पुण्यातल्या वास्तवाचा टिळकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. टिळकांच्या आईचे निधन लवकर झाले व मातृछत्र हरवले. टिळकांचा सांभाळ काकांनी केला. टिळकांनी लग्नाच्या वेळी देखील हुंड्याऐवजी पुस्तके घेऊन द्या असा हट्ट धरला. शाळेत शिकवला जाणारा मेरी आणि एलिझाबेथचा इतिहास बाजूला ठेवून त्यांनी हिंदू धर्मग्रंथाचा अभ्यास केला. १८७२ मध्ये मॅट्रिक नंतर त्यांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. परंतु लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार होते यावरून त्यांना चिडवलं जात असताना त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि एका वर्षात शरीर संपदा कमवली. कुस्ती, पोहणं, नौका चालवणं हे त्यांचे आवडते खेळ होते. पुढे बी ए पास झाल्यानंतर १८७९ साली एल. एल. बी साठी प्रवेश घेतला. इथेच त्यांचा परिचय गोपाळ गणेश आगरकरांशी झाला. आणि समाज ध्येयाने प्रेरित होऊन या दोन तरुणांनी मग मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी राष्ट्रोधाराच्या कार्यात स्वतःला वाहून घेतलं. लोकांमधील अज्ञान नाहीसं करण्याचं ध्येय साध्य करण्यासाठी ज्ञान प्रसाराच्या विचाराने विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक आणि आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली . याशिवाय "मराठा" आणि "केसरी" हे वर्तमान पत्र सुरू केले. ज्यामध्ये मराठी लोकांना जाग आणण्यासाठी  "केसरी" गर्जना करत होता आणि राष्ट्रीय भावनेचा अंगार "मराठा" प्रज्वलित करत होता. पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून टिळक आणि आगरकरांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं आणि या पुढील  काळातच सामाजिक सुधारणे वरून टिळक आणि आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले पण मनभेद मात्र कधीच नव्हते. पण वादानंतर आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला आणि टिळक केसरीचे संपादक झाले. केसरीतून त्यांनी राष्ट्रीय विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचं ठरवलं आणि ते सातत्याने करत राहिले. तसेच लोक जागृती घडवण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केला. यावेळी त्यांच्यासोबत ब्राह्मण समाज ही आल्याने त्यांना तेलातांबुळ्याचे "पुढारी" म्हणूनही ओळख मिळाली.

        टिळकांनी राष्ट्रीय विचारांचं बीजारोपण करत राजकारणात जहाल मत वादाचा पुरस्कार केला. पुढे याच  विचारांना काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे गट होऊन फुट पडली. २४ जून १९०८ रोजी राजद्रोहाच्या कलमाखाली टिळकांनी भोगलेला ब्रह्मदेशात मंडालेचा सहा वर्षांचा कारावास हा त्यांच्या उत्तर आयुष्यातील महत्त्वाचा, वैशिष्टपूर्ण, आणि तेवढाच खडतर सुद्धा ....उन्हाळ्यात मंडाले चा तुरुंग म्हणजे लोहार कामाची तापलेली भट्टीच जणू! लाकडी दरवाजे यापासून कोणाचंच  संरक्षण करू शकत नसंत.अशा परिस्थितीत लोकमान्य गीतारहस्य हा महान ग्रंथ लिहिला. यावेळी टिळकांच्या सुटकेसाठी त्यांचे स्नेही आणि कायदे तज्ञ दादासाहेब खापरडे यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. यादरम्यान अचानक मंडालेत टिळकांची प्रकृती बिघडली आणि त्याच दरम्यान पुण्यात त्यांच्या पत्नीच निधन झालं. सहा वर्षांची प्रदीर्घ शिक्षा भोगुनीही त्यांचा ध्येय धोरणांमध्ये तीळमात्रही बदल झाला नाही. यानंतर त्यांनी हिंदू-मुस्लीम एकजूट घडवून स्वराज्य मागणीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली. यादरम्यान होमरूल लीगची स्थापना केली आणि ऍनिबेझल्ट यांच्या सोबत भारतीय जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ते झगडले. टिळकांचा निर्भीडपणाची साक्ष म्हणजे केसरी मध्ये त्यांनी लिहिलेले अग्रलेख पुरेसे आहेत. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? इतके सडतोड त्यांची भूमिका होती. दुष्काळ आणि प्लेग सारख्या साथी आल्यानंतरही सरकारी अधिकारी आणि नोकरवर्ग यांच्याकडून जे सातत्याने जनतेवर अत्याचार झाले त्यावेळी त्यांनी कडक शब्दात निषेध केला.

        बिझनेस नेटवर्कचा वापर पॉलिटिकल नेटवर्क वाढवण्यासाठी टिळकांनी सर्वात आधी आपल्या देशात सुरू केला. शेतकरी, मजूर आणि व्यापारी या तिन्ही वर्गातील लोकांचा स्वातंत्र्य चळवळीसाठी टिळकांना उपयोग करून घेता आला आणि आपले राजकीय मतं खऱ्या अर्थाने समाजाच्या सर्व घरात पोहोचवता आली. यादरम्यान टिळक लंडनमध्ये चिरोलिया या पत्रकारावर खटला दाखल करण्यासाठी गेले होते या खटल्यादरम्यान त्यांना यश मिळाले नाही. परंतु त्याचवेळी त्यांची लंडन मध्ये झालेली व्याख्यान प्रचंड गाजली. ज्यातून त्यांनी स्वराज्याच्या मागणीचा प्रसार केला.

       लोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे जनक होते. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य चतुःसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला आणि स्वराज्याचा मंत्र त्यांनी लोकांचा मनामनात ठसवला. परंतु राजकारणाच्या धकाधकीतही त्यांचा पिंड विद्वानांचा होता आणि तो तसाच कायम राहिला. त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व वेळोवेळी दिसून आलं. गीतारहस्य, आर्टिक होम इन द् वेदाज, वेदांगज्योतिष अशा या अभ्यास पूर्ण ग्रंथसंपदा याचीचं साक्ष देणारे, इतकच नाही तर नव्याने बाळसं धरणाऱ्या मराठी नाट्य चित्रपट क्षेत्राशी देखील टिळकांशी संबंध आला होता, अशीच एक आठवण म्हणजे टिळकांचा हा भारदस्त आवाज ...! खगोलशास्त्र, न्यायशास्त्र, वैदिक शास्त्र, अर्थशास्त्र, आयुर्वेद या सगळ्या क्षेत्रात त्यांचा हातखंडा होता. खगोलशास्त्र विषयात त्यांनी सखोल अभ्यास करून जे पंचांग विकसित केलं तेच म्हणजे टिळक पंचांग! यासोबतंच टिळकांची अनेक सामाजिक कार्य सुरू केली.  दारूबंदी चळवळ, पैसा फंड हि संस्था पल वृद्धिंगत करून लाखो रुपयांचा निधी त्यांनी सामाजिक हितासाठी जमा केला. इतक्या वैविध्यपूर्ण जीवन क्षेत्रात संचार करूनही कुटुंबासोबत ची त्यांची वेळ तितकीच घट्ट होती. भारतात राष्ट्रवादी विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले यातूनच त्यांना 'असंतोषाचे जनक' ही उपाधी मिळाली. त्या काळामध्ये हिंदुस्थानातल्या नेत्यांमध्ये त्यांना अग्रक्रमाचे स्थान मिळाले. टिळक हे भारताचे पहिले राजकीय नेते ठरले. अविरत, अविश्रांत धडपडणाऱ्या लोकमान्यांना उतारवयात मधुमेहाच्या आजाराने गाठले. त्याचवेळी वैद्यांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण विचारांच्या वावटळीने तो  कृतीत येत नव्हता. यावेळी टिळक मुंबईच्या सरदार गृहात होते. त्यांना हिवतापानंही घेरलं. वैद्याचे उपचार सुरु होते, थोड्याच दिवसात त्यांना वाताचे झटके येऊ लागले, बोलण्यात विसंगती वाटू लागली. आप्तांची, चाहत्यांची मन चिंतातुर झाली. अखेर १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांची इहलोकीची यात्रा संपली. टिळकांनी जगाचा निरोप घेतल्याची बातमी मुंबईत आणि साऱ्या देशभर वाऱ्यासारखी पसरली. सारा देश दुःखाच्या शोकसागरात लोटला आणि भारताचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला. सूर्य जरी अस्ताला गेला असला तरी त्यांच्या विचारांचे तेज आजही जीवन जगण्याची, संघर्ष करण्याची उर्मी देतात. लोकमान्यांना जरी त्यांच्या डोळ्याने स्वातंत्र्य पाहता आलं नाही तरी त्यांनी स्वातंत्र्याची पायाभरणी केली होती आणि त्यातूनच आजचा हा भारत देश घडला आहे. आणि त्या भारत देशाची संस्कृती एकसंघतेची  शिकवण देत आहे आणि नव्या पिढीला घडवत आहे आणि घडवणार सुद्धा आहे.       

        लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन  ..... संकलन - प्रदिप रमेश गावडे.




No comments:

Post a Comment