महापुर, कोरोना व अन्य कार्याची दखल घेवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या कोल्हापुर जिल्हा समन्वयकपदी प्रा. संजय पाटील यांची निवड, त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा........ - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2021

महापुर, कोरोना व अन्य कार्याची दखल घेवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या कोल्हापुर जिल्हा समन्वयकपदी प्रा. संजय पाटील यांची निवड, त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा........

प्रा. संजय पाटील

संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील हिंदी विभागाध्यक्ष व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्राध्यापक संजय पाटील (निट्टुर, ता. चंदगड) यांची शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कोल्हापुर जिल्हा समन्वयकपदी निवड झाली आहे. त्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून विविध विभागात केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची निवड झाली आहे. 

रामघाट (ता. चंदगड) येथे गरजुंना जीवनावश्यक वस्तु वाटप करताना फोटोच्या उजव्या बाजुला प्रा. एस. एन. पाटील.

       प्राध्यापक पाटील हे माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी म्हणून १० वर्षं व सहप्रकल्प अधिकारी म्हणून १२ वर्षे निरंतर सेवा बजावत आहेत.  महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच त्यांनी या योजनेचा विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून कार्य केले आहे. एन. एस. एस. चे ब्रीद "NOT ME BUT YOU"  चा  अंगीकार करत ही योजना ग्रामीण भागातील तळागाळातील  लोकांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांनी कार्य केले आहे. 

राष्ट्रीय सेवा योजना श्रमदान करताना स्वयंसेवक. निरिक्षक करताना प्रा. पाटील.

      या समाजाभिमुख कार्यामध्ये  ग्रामस्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संरक्षण, जल व्यवस्थापन, प्रदूषण मुक्ति अतिक्रमण हटविणे, वृक्ष लागवड व संवर्धन, प्लास्टिक मुक्ति अभियान, एड्स व मतदान जनजागृती, पशु चिकित्सा शिबिरे, आरोग्य शिबिरे, अवयवदान शिबिरे, कृषी, कायदे, रोजगार, पशु संवर्धन, दळणवळण, लसीकरण, पथनाट्य, लोकसंख्या नियंत्रण, आत्महत्या,जल व्यवस्थापन, वाचन प्रेरणा, साहित्य व संस्कृती, महिला सबलीकरण, रक्षाबंधन, व्यसनमुक्ती, हुडाबंदी, व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास अशा विविध विषयांवर कार्यशाळा व प्रबोधनात्मक उपक्रम राबवून विद्यार्थी व समाजाच्या उन्नतीसाठी ते निरंतर कार्य करत आहेत.  

२०१९ मध्ये आलेल्या महापुरातील इनाम सावर्डे ग्रामस्थांचे पुर्नवसन.

        महापुराच्या कालावधीमध्ये त्यांनी कांही सामाजिक संघटनांच्या मदतीने NSS स्वयंसेवकांच्या वतीने मोठे मदत कार्य केले आहे. महापुरातील संकटग्रस्त ८०० लोकांचे पुनर्वसन महाविद्यालय व इतर सोईस्कर ठिकाणी करुन त्यांना महिनाभर भोजन, आरोग्य व वास्तव्याच्या सुविधा दिल्या.  डिलीव्हरी झालेल्या महिला, वयस्क व आजारी लोकांना स्वतःच्या घरी आश्रय दिला. 

शिमोगा येथे NIC Camp मध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करुन द्वीतीय क्रमांक प्राप्त केलेली टीम. 

          निराधार व घरे पडलेल्या लोकांना आर्थिक मदत केली. महापुरात अडकलेल्या मजुर, कामगार व गरीब गरजू ३६० कुटुंबियांना अन्नधान्य, आरोग्य, कपडे, पांघरून इ. जीवनावश्यक  वस्तूंची मदत केली. स्थानिक सेवाभावी डॉक्टरांच्या मदतीने तालुक्यातील पूरग्रस्त व आपत्तीग्रस्त  वाड्या-वस्तीतील २००० लोकांना आरोग्य सुविधा व जीवनावश्यक वस्तूंचे स्वखर्चाने वाटप केले. कांही गावांनीही धान्यरूपात या सेवाकार्यात मोलाची मदत केली.

सडेगुडवळे येथे गावरानमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्याकरवी वृक्षारोपण करवून घेताना प्रा. पाटील.

         कोरोना महामारीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी स्वयंसेवकांच्या मदतीने ते आजतागायत अहोरात्र झटत आहेत. हँडमेड मास्क व सॅनिटायझर वाटप, सामाजिक अंतर राखण्याचे प्रबोधन घरोघरी जाऊन करत आहेत. 

कोरोना काळात चंदगड नगरपंचायत सहकारी व पोलिस मित्र म्हणून कार्य करताना स्वयंसेवक.

        चंदगड नगरपंचायतीच्या मदतीने रस्त्यांवर तपासणी बूथ लावून गर्दीवर नियंत्रण आणले. पोलीस मित्र म्हणून स्वयंसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवाकार्य केले. यात त्यांचा संपूर्ण परिवार सहभागी होता. स्वयंसेवकांच्या जेवणाची व राहण्याची सोय त्यांनी आपल्या घरी केली.    

नगरगाव धनगरवाडा येथे आरोग्य सुविधा व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. 

              चंदगडसह अवतीभवतीची अनेक गावे दत्तक घेऊन त्या गावांमध्ये आज "माझा गाव कोरूना मुक्त गाव" ही मोहीम स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी पणे  राबवत आहेत. महापुरात सापडलेल्या दुर्गंधीयुक्त गावांतील    आरोग्य सेवेसाठी त्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.

पास रेस्क्यु  फोर्स टीममध्ये एन. एस. एस. चे सहभागी समन्वयक.

         पास रेस्क्यू फोर्सच्या मदतीने त्यांनी तयार केलेले स्वयंसेवक आज अनेकांचे प्राण वाचवत आहेत. कोरोना  बाधितांची ने-आण व शववाहिकेवर स्वेच्छेने कार्य करत आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली घडलेले असे अनेक स्वयंसेवक तालुका व अन्यत्र सेवा उत्तम बजावत आहेत.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन. 

             विद्यापीठाच्या विभिन्न राज्य व राष्ट्र स्तरीय उपक्रमात सातत्याने स्वतः सहभाग घेत विद्यार्थ्यांना सहभागी केले. NIC  राष्ट्रीय एकात्मता कॅम्प, शिमोगा येथे विद्यापीठाच्या टीमचे नेतृत्व करत विद्यापीठाचा नावलौकिक  विविध उपक्रमातील प्रथम क्रमांकाच्या यशाने सर्वदूर पोहोचविला.

स्वयंसेवकांसाठी योगासनांची प्रात्यक्षिके करुवून घेताना. 

         वारी, दिंडी, नेतृत्व विकास, प्रेरणा व एकता शिबिरात अनेक स्वयंसेवक सहभागी केले. महाविद्यालयाची दत्तक खेड्यामध्ये २२ विशेष श्रमसंस्कार शिबिरे संपन्न झाली. त्यातील अधिकतर शिबिरांचे यशस्वी नेतृत्व केले. ऑनलाईन व ऑफलाईन  वेबिनारचे आयोजन करून समाज प्रबोधन केले. स्वतःच्या गावासाठी ८०,००० ची मदत देऊन गावातील दुध डेअरी संगणकीकृत करवून दिली. शाळा व इतर विविध उपक्रमांसाठी मदत दिली. गरीब विद्यार्थ्यांची मदत केली. 

छत्रपती संभाजीराजे फौंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजदिन साजरा.

           अशा अनेकविध स्वतः केलेल्या व स्वयंसेवकांच्या करवी करवून घेतलेल्या कामांची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने त्यांना कोल्हापूर जिल्हा समन्वयक पदी बढती दिली आहे. या सर्व प्रवासासाठी त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी. आर. पाटील, खेडूत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, रासेयोचे शिवाजी विद्यापीठ समन्वयक अभय जायभाये, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, प्राध्यापक -प्राध्यापकेतर सहकारी यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. आजी-माजी स्वयंसेवक, त्यांचा स्वतःचा परिवार, ग्रामस्थ, हीतचिंतक यांची मोलाची साथ व सहकार्य लाभले. यापुढेही हा सेवाभावी प्रवास असाच गतिमान ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.No comments:

Post a Comment