``दर्पण`` मुळे भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा पाया भक्कम - विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, शिवनगे येथे `दर्पण` दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2022

``दर्पण`` मुळे भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा पाया भक्कम - विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, शिवनगे येथे `दर्पण` दिन साजरा

शिवनगे (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणदिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकार संघाचे सर्व सदस्य.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या दर्पण या नियतकालिकामुळे भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा पाया भक्कम आहे. पत्रकारामुळेच सामाजिक संतुलन टिकून आहे. लेखणी ही खऱ्या अर्थाने पत्रकारांचा आत्मा असल्याचे प्रतिपादन पंंचायत समितीचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी केले.

       ते शिवनगे (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका पत्रकार संघा (रजि.) च्या वतीने आयोजित केलेल्या दर्पण दिनानिमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष नंदकुमार ढेरे होते.

शिवनगे येथील माजी आमदार कै. नरसिंगराव भुजंग पाटील यांच्या समाधीस्थळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कै. पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, अनिल धुपदाळे, संपत पाटील, चेतन शेरेगार व इतर.

          प्रारंभी सर्व पत्रकारांनी शिवनगे येथील माजी आमदार कै. नरसिंगराव भुजंग पाटील यांच्या समाधीस्थळी भेट देऊन कै. पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. मराठी पत्रकारितेचे पितामह तथा जेष्ठ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्र सृष्टीतील पहिल्या "दर्पण " या वृत्तपत्राच्या स्थापना दिवस दर्पणदिन म्हणून साजरा करण्यात आला.

         प्रास्ताविक उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी करून आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मतारीख ६ जानेवारी नसून २० फेब्रुवारी १८१२ हि आहे. ६जानेवारी १८३२ या दिवशी आचार्य जांभेकर यांनी भारतीय वृत्तपत्र सृष्टीतील पहिले दर्पण हे नियतकालिक सुरू केले होते. त्यामुळे ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिनाऐवजी दर्पणदिन म्हणून साजरा करत असल्याचे सांगितले.

            तालुकाध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी यावेळी जांभेकरांचे कार्यक्षेत्र अफाट होते. त्यांनी समाजाच्या विविध अंगातून सांस्कृतिक, शैक्षणिक, महिलांविषयी लेखणीतून वेगळा प्रभाव निर्माण केला होता. तत्कालीन समाजावर त्याचा प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी रोवलेला पाया वर्षानुवर्षे आजही मजबूत असल्याचे सांगितले. 

        अनिल धुपदाळे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांना शासनाचे संरक्षण देण्याची उपाययोजना करावी अशी विनंती  केली. यावेळी पत्रकारांनी कोरोना काळात घडलेल्या अनुभवांबाबत एकमेकांशी चर्चा केली आणि पत्रकार क्षेत्रात दिवसेंदिवस घडणारे बदल, सोशल मीडियामुळे आपल्या जाहिरातींवर झालेले परिणाम आदी गोष्टींवर चर्चा करून भविष्यात आपली पत्रकारिता भक्कमपणे टिकून कशी राहील याची बांधणी करण्यात आली.

          या कार्यक्रमाला संस्थापक उदयकूमार देशपांडे, संपत पाटील, चेतन शेरेगार, प्रदीप पाटील, तातोबा गावडे-पाटील, महेश बसापूरे, सागर चौगुले, बाबुराव मुंगारे आदी उपस्थित होते. आभार नंदकिशोर गावडे यांनी मानले. 

No comments:

Post a Comment