![]() |
| जप्त केलेली वाहने, गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स व पोती, पकडलेले आरोपी यांच्यासह चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सोबत पोलीस अधिकारी व कर्मचारी. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी चंदगड पोलीस टीमने नजीकच्या काळातील सर्वात मोठी कारवाई करत गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी ४ वाहने व त्यातील दारू असा तब्बल ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात तब्बल ८ लाख १२ हजार ८८० रुपयांच्या विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारू बाटल्यांचा समावेश आहे. पोलीस कॉन्स्टेबल अशुतोष शिऊडकर यांच्या फिर्यादीवरून या घटनेची पोलिसात नोंद झाली असून मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी गुरुवार दि. ३० रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास तिलारी नगर ते धामणे कडे जाणाऱ्या मार्गावर बांदराईवाडी-धनगरवाडा गावाच्या हद्दीत सुभाष लांबोरे यांच्या शेताजवळ काही संशयास्पद व्यक्ती डंपर मधून आणलेल्या दारूच्या बाटल्या बोलेनो कार, स्विफ्ट डिझायर, इको कार व रेनॉल्ट क्विड कार मध्ये भरत होते. सर्व आरोपी महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने वरील किमतीच्या बाटल्या अन्यत्र विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत होते. याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह पोलीस हवालदार सुनील माळी, अजित वाडेकर, वासिम देसाई, निरंजन जाधव, ईश्वर नावलगी आशुतोष शिउडकर या पोलीस पथकाने धाडसी कारवाई करत सर्व मुद्देमालासह आरोपींना रंगेहात पकडले.
या कारवाईत १० आरोपींवर कारवाई करण्यात आली असून धूळो फोंडे (गावठाडे सतपाल, तालुका धारबडोदा दक्षिण गोवा), विजय वसंत झोरे (मनेरी धनगरवाडा, ता. दोडामार्ग), गणपती मारुती पाटील (मांडेदुर्ग ता. चंदगड), संजय पांडुरंग नाईक (हलकर्णी तालुका चंदगड), दिलीप शिवाजी मयेकर (पार्ले, तालुका चंदगड), अजय दत्तू नाईक (वरगाव, तालुका चंदगड), सागर नाईक (रा. गोवा), सुभाष बांदिवडेकर (नागनवाडी, तालुका चंदगड), उमेश आवडन (तुडये, ता. चंदगड) विजय आवडण (रा. वैतागवाडी, तालुका चंदगड) आदींवर गुन्हा नोंद केला आहे. या दहा पैकी चार संशयित आरोपी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरले असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या व फरार आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (इ) 83, 90, 108 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
या गुन्ह्यात ८ लाख १२ हजार ८८० रुपयांची गोवा बनावटीची दारू, डंपर किंमत १८ लाख रुपये, बलेनो कार किंमत ७ लाख रुपये, स्विफ्ट डिझायर किंमत ५ लाख रुपये, रेनॉल्ट क्विड किंमत ४ लाख रुपये असा एकूण ४२,१२,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर इको कार हे वाहन जप्त केलेले नाही. चंदगड पोलिसांनी अलीकडच्या काळात अनेक वेळा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर काही वेळा फिल्मी स्टाईल थरारक पाठलाग करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस हवालदार सुनील माळी, पोलीस हवालदार अजित वाडेकर, पोलीस हवालदार निरंजन जाधव, पोलीस नाईक वासिम देसाई, पोलिस अंमलदार ईश्वर नावलगी, पोलिस अंमलदार आशुतोष शिउडकर यांच्या पथकाने हि कारवाई केली.
तथापि काल झालेली कारवाई यात सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. याबाबत चंदगड पोलीस टीमचे अभिनंदन होत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील स्वतः करत आहेत.

No comments:
Post a Comment