चंदगड नगरपंचायतसाठी डॉ. नंदाताई बाभुळकर व माजी आमदार राजेश पाटील एकत्र, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली घोषणा - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2025

चंदगड नगरपंचायतसाठी डॉ. नंदाताई बाभुळकर व माजी आमदार राजेश पाटील एकत्र, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली घोषणा

 

राजेश पाटील                                             डॉ. नंदाताई बाभुळकर

संपत पाटील, चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        चंदगड नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी दिनांक १० पासून अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या या पहिल्याच दिवशी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेत अजित पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार राजेश पाटील व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या गटाच्या प्रमुख व माजी मंत्री दिवंगत बाबा कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांना एकत्र करत चंदगड नगरपंचायतीमध्ये या दोघांची युती जाहीर करून टाकली. यानंतर आता नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडूनही हालचाली गतिमान झाल्या आहेत. मंगळवारपासून भाजप समर्थक व अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडूनही लहान सहान गटांना तसेच माजी नगरसेवकांना आपलेसे करून घेण्यासाठी प्रयत्न करतील, असा अंदाज चंदगड येथील जाणकारातून व्यक्त होत आहे. 

    सद्यस्थितीमध्ये डॉ. नंदाताई बाभुळकर, माजी आमदार राजेश पाटील यांच्या सोबतच काँग्रेसचे चंदगड येथील पदाधिकारी जातील अशी शक्यता आहे. या पुढील काळात आता भाजपही आपापल्या पद्धतीने आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जातील तर सत्ताधारी राजेश पाटील यांच्या गटाकडूनही जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. मंगळवारी दि. ११ पासून आता चंदगड शहरात राजकीय हालचाली गतीने सुरू होतील.

No comments:

Post a Comment