ढोलगरवाडी येथील नागपंचमी कार्यक्रमावर बंदी..! वाचा काय आहे कारण.... महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील सर्प प्रेमींतून संताप - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2022

ढोलगरवाडी येथील नागपंचमी कार्यक्रमावर बंदी..! वाचा काय आहे कारण.... महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील सर्प प्रेमींतून संताप

संग्रहित छायाचित्र


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील नागपंचमीला होणारे सर्पप्रदर्शन व सापाबद्दलची शास्त्रोक्त माहिती देणारा उत्सव यंदा बंद करण्याची नामुष्की शेतकरी शिक्षण मंडळ संचलित संस्थेवर ओढवली आहे. सेंट्रल झु ऑथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण नागपूरने दिलेल्या मान्यता रद्दच्या दुसऱ्या नोटिसीस अनुसरून वनविभागाने कार्यक्रमास मनाई केल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील सर्पप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली असून बंदी आदेशाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

            सन २०१९ चा महापूर व त्यानंतर दोन वर्षे कोरोना महामारीमुळे खंडित झालेला प्रबोधन कार्यक्रम यंदा उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय शेतकरी शिक्षण संस्थेने घेतला होता. तथापि केंद्रीय पर्यावरण मंत्रालय संबंधित  विभागांच्या अडमुठेपणामुळे त्याला खीळ बसली आहे.

   १९६६ पासून आद्य सर्पमित्र कै बाबूराव टक्केकर यांनी साप हा आपला शत्रू नसून तो मित्र आहे. पर्यावरण संतुलन साखळीतील तो सर्वोच्च महत्त्वाचा घटक आहे. हे शास्त्रोक्त पद्धतीने जनमानसावर बिंबवण्याचे समाजकार्य सेंट्रल 'झू' च्या स्थापनेपूर्वीपासून सुरू केले. ते गेली ५६ वर्षे अखंडितपणे सुरू आहे. सर्पमित्र टक्केकर यांचे शिष्य त्यांचा वारसा ५६ वर्षे कोणताही शासकीय निधी नसताना आजही पुढे चालवत आहेत. किंबहुना शासनाचेच काम करत आहेत. 

          तथापि सेंट्रल झु ऑथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली यांनी हे सर्पोद्यान वन्य प्राणी संग्रहालय नियमावलीची पूर्तता करत नाही हे कारण दाखवत सर्पालयाची मान्यता रद्द करण्याची नोटीस २०१६ ला प्रथम बजावली. त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील आमदार, खासदार, मंत्री, शासकीय अधिकारी, सर्प प्रेमी व ग्रामस्थांच्या सहकार्याने न्यायालयीन लढाईत सर्पोद्यानला तात्पुरती मुदतवाढ मिळाली. दरम्यानच्या काळात केंद्र व राज्य सरकार संबंधित लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे अटींची पूर्तता करण्यासाठी हवी असलेली २५ एकर जमीन सर्पोद्यानसाठी मिळाली नाही. व ५६ वर्षांची परंपरा खंडित होण्याची नामुष्की शेतकरी शिक्षण मंडळावर ओढवली. 

           ढोलगरवाडी सर्पालय हे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यातील वन विभाग, पोलीस, आर्मी, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर, शेतकरी आदींसाठी माहिती व अभ्यास केंद्र ठरले होते. या सर्वांना येथील मामासाहेब लाड विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक सर्व सापांविषयी मोफत मार्गदर्शन करत. सर्पालय शासनाच्या उदासीनतेमुळे कायमस्वरूपी बंद पडले तर सर्वांची गैरसोय होऊन सर्प व पर्यावरण प्रबोधनाला खीळ बसणारच पण राज्यातील एक आगळे वेगळे पर्यटन केंद्र इतिहास जमा होणार यात शंका नाही. 

           सर्पोद्यानमध्ये सद्यस्थितीत असलेले विविध जातींचे तीस ते पस्तीस साप जंगलात सोडून देण्याची वेळ जवळ येऊन ठेपल्याचे उद्विग्न  स्वरात तानाजी वाघमारे यांनी सांगितले. त्यांनी सेंट्रल 'झु' व इतर संलग्न विभागांच्या अटी लवकरच पूर्ण करून पर्यावरण व वनसंवर्धन, तसेच सर्प विषयक शास्त्रीय ज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने अखंडपणे सुरू ठेवू असा आशावाद  व्यक्त केला असला तरी यंदा २ ऑगस्ट २०२२ रोजीच्या नागपंचमी उत्सवावरील गंडांतर निश्चित आहे.

No comments:

Post a Comment