कालकुंद्री राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बेळगुंदी संघ अजिंक्य, सांगली उपविजेता, स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाला उदंड प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2025

कालकुंद्री राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बेळगुंदी संघ अजिंक्य, सांगली उपविजेता, स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाला उदंड प्रतिसाद

 

 सांगलीच्या खेळाडूंनी बेळगुंदीच्या खेळाडूची केलेली थरारक पक्कड

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कलमेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या थरारक अंतिम सामन्यात बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) संघाने सांगली संघाचा ३० विरुद्ध २५ गुणांनी निसटता पराभव करत अजिंक्यपद पटकावले. सांगली संघ उपविजेता ठरला.  तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात राजगोळी बुद्रुक संघाला हरवून कडलगे बुद्रुक संघाने तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातील १८ दिग्गज संघानी सहभाग घेतला होता.

प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्विकारताना बेळगुंदी संघ

      साखळी फेरीतील सामन्यानंतर बेळगुंदी, सांगली, राजगोळी बुद्रुक, कडलगे बुद्रुक, कालकुंद्री, इचलकरंजी, निट्टूर, किणी हे तुल्यबळ संघ सुपरएट फेरीत दाखल झाले होते. स्पर्धेतील सर्वच सामने थरारक व प्रेक्षणीय झाले. कालकुंद्री येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील हजारो कबड्डी शौकिनांनी गर्दी केली होती. प्रेक्षकांकडून सर्वच संघांना मिळत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल बाहेरून आलेल्या संघांनी तालुक्यातील प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले.

दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस स्वीकारताना सांगलीचा संघ

   स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे रोख रुपये ३१ हजार, २१ हजार व ११ हजार बक्षीस व भव्य चषक देण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट पकड अमित सरगर (सांगली), उत्कृष्ट चढाई गणेश तारू (सांगली), अष्टपैलू खेळाडू तुषार खडके (बेळगुंदी) यांना रोख बक्षीस व चषक देण्यात आले. उपस्थित क्रीडा शौकिनांनी सांगली व इचलकरंजी संघातील खेळाडूंवर रोख बक्षिसांचा वर्षाव केला. इचलकरंजी संघात सौरभ पगारे व आदित्य पवार या दोन प्रो कबड्डी स्टार खेळाडूंचा समावेश होता. तथापि हा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही.

तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस स्विकारताना कडलगे बुद्रुक संघ

    बक्षीस वितरण प्रसंगी निवृत्त नौदल अधिकारी अशोक पाटील, नितीन खवणेवाडकर, विलास शेटजी, तुकाराम जोशी, जे. एस. पाटील, विठोबा पाटील, भरमू पाटील, भावकु पाटील, चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, सी एल न्यूजचे संपादक संपत पाटील, रमेश पाटील, जोतिबा पाटील, सुखदेव भातकांडे मधुकर कोकितकर आदी मान्यवर उपस्थित होते.

   स्पर्धा पंच म्हणून निवृत्ती पाटील, भरत पाटील, भाऊ पाटील, तुळशीदास जोशी महाराज आदींनी काम पाहिले. स्पर्धेचे धावते समालोचन प्रा. विनायक कांबळे, रवी पाटील, सुभाष बेळगावकर, कल्लाप्पा पाटील (लादेन), प्रथमेश पाटील यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अभिजीत पाटील, सुभान मोमीन, तुषार पाटील, विनायक पाटील, किरण मुतकेकर,वैजनाथ तेरवाडकर आदींनी परिश्रम घेतले.

*थेट प्रक्षेपण-*

        या संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत सदस्य विठोबा सिताराम पाटील यांच्या सौजन्याने 'चंदगड' चे मुखपत्र चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह न्युज तथा 'सी एल न्यूज' वर करण्यात आले होते. याचा लाभ महाराष्ट्रासह गुजरात, जम्मू कश्मीर, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, हैदराबाद, तेलंगणा दिल्ली अशा देशातील सर्व भागातील हजारो कबड्डी शौकिनांनी  घेतलाच. 

    पण चंदगड, गडहिंग्लज उपविभागातील परदेशात राहणाऱ्या मंडळींनीही घेतला. थेट प्रक्षेपणाबद्दल कॉमेंटच्या माध्यमातून 'सी एल न्यूज' वर अभिनंदनचा वर्षाव होत होता. पत्रकार संघटनेमार्फत चालवण्यात येत असलेले सी एल न्यूज हे अशा प्रकारचे महाराष्ट्रातील एकमेव पोर्टल चॅनेल असून ते चंदगड उपविभागासह राज्य, देश व जगभरातील १९ देशांमध्ये या चॅनेलचे दर्शक व वाचक पसरलेले आहेत.

No comments:

Post a Comment