चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
“शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसतो, तर समाजातील विचारांचा दीपस्तंभ असतो. विद्यार्थ्यांना घडवताना तो मूल्यांचे संस्कार देतो आणि समाजात परिवर्तनाची दिशा ठरवतो. प्रा. एस. के. सावंत यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेतून हीच भूमिका निष्ठेने पार पाडली,” अशा भावना कोवाड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी व्यक्त केल्या. ते र.भा. माडखोलकर महाविद्यालयातील आकौन्टशी विभागाचे प्रमुख व माजी प्रभारी प्राचार्य प्रा. एस. के. सावंत यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.आपल्या भाषणात डॉ. निळंपणकर पुढे म्हणाले की, अकौउंट सारख्या अवघड विषयाची गोडी विद्यार्थ्यांना त्यांनी लावली, अवघड विषय सोपा करून शिकवण्याची त्यांची हातोटी होती लेखाशास्त्र या विषयात त्यांनी विद्यार्थ्यांना घडवले असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जी. एस. पाटील होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, प्रा. सावंत हे संस्थेचे केवळ सेवक नव्हते, तर संस्थेच्या मूल्यांचे जिवंत उदाहरण होते. त्यांची शिस्तबद्धता, वेळेचे भान आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले आत्मीय संबंध हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. संस्थेच्या वाढीमध्ये सावंत सरांचे योगदान अविस्मरणीय राहील, असेही त्यांनी नमूद केले.
संस्थेचे संचालक प्रा. ॲड. एन. एस. पाटील म्हणाले की, सावंत सर हे शैक्षणिक प्रामाणिकतेचा आदर्श आहेत. अध्यापनाबरोबरच त्यांनी प्रशासनातही नीतिमत्ता, जबाबदारी आणि पारदर्शकतेची भूमिका जपली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची कार्यतत्परता ही संस्थेच्या प्रगतीचा आधार ठरली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. त्यांनी सावंत सरांच्या तीन दशकांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवासाचा आढावा घेत सांगितले की, त्यांनी संस्थेच्या विकासाला दिशा देत शिक्षक म्हणून आदर्श निर्माण केला.
संस्थेच्या वतीने ज्येष्ठ प्रा. एस. के. सावंत व त्यांच्या पत्नी सौ. वंदना सावंत यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, प्रा. आर. पी. पाटील, आर जी देसाई,डॉ. टी. ए. कांबळे, प्रा. व्ही. के. गावडे, ऑडवोकेट संतोष मळवीकर, डॉ. सौ. ए. पी. पाटील, डॉ. पी. एल. भादवनकर, माजी सभापती अनंत कांबळे, सौ. अस्मिता सावंत, देसाई सर आदींनी सावंत सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सेवानिवृत्ती निमित्त बोलताना प्रा. एस. के. सावंत यांनी संस्थेबद्दल, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थ्यांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “संस्थेने मला कार्य करण्याची संधी दिली, साथ दिली. हा प्रवास माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला. शिक्षण ही माझी साधना होती आणि संस्थेचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आहे.”
या कार्यक्रमास संचालक एन के पाटील, माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे, एड. आर. पी. बांदिवडेकर, एड. विजय कडुकर, संचालक शामराव मुरकुटे, एम. बी. पाटील, एड. एल. व्ही. भातकांडे,adv. एस एस पाटील तसेच चंदगड बार असोसिएशनचे वकील, प्रतिष्ठित नागरिक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एन एस. मासाळ यांनी केले. या कार्यक्रमाला चंदगड तालुक्यातील विविध शिक्षण प्रमुखविविध शिक्षणप्रेमी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment