'माता सुरक्षित तर घर सुरक्षित 'अभियानाला चंदगड तालूक्यात सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2022

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित 'अभियानाला चंदगड तालूक्यात सुरवात

संग्रहित छायाचित्र

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी दिनांक 26 सप्टेंबर पासून ते 25 ऑक्टोबर पर्यंत चंदगड तालुक्यात महिला, माता व गर्भवती महिला यांच्यासाठी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित'हे अभियान राबविले जात असून याचा लाभ घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी केले आहे.

             सोमवारपासून राबवल्या जाणाऱ्या या अभियानात 18 वर्षावरील सर्व महिला,माता व गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे आधी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सदरील अभियानात स्त्रियांचे वजन,उंची,हिमोग्लोबिन व रक्तातील साखर तसेच रक्तदाब इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत. गरज भासल्यास रक्ताच्या इतर चाचण्याही करण्यात येणार आहेत. गरोदर स्त्रियांची संपूर्ण तपासणी तसेच संपूर्ण रक्त चाचण्या करण्यात येणार आहेत व गरोदर स्त्रियांसाठी संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत एक वेळ मोफत सोनोग्राफी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच माता व बालकांचे लसीकरण सुद्धा करण्यात येणार आहे.

             प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर, उपकेंद्रस्तरावर, गाव स्तरावर या मोहिमे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविका यांच्यामार्फत ही तपासणी होणार आहे. तालुक्यातील सर्व महिला माता व गर्भवती स्त्रियांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी  चंद्रकांत बोडरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment