चंदगड आगाराचा मनमानी कारभार, अचानक फेऱ्या रद्दचा प्रवाशांना फटका - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2023

चंदगड आगाराचा मनमानी कारभार, अचानक फेऱ्या रद्दचा प्रवाशांना फटका

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड एस. टी. आगार प्रमुखांच्या मनमानीचा जोरदार फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता नेहमीच्या मार्गावरील बससेवा रद्द केली जात असल्याने प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

        गेल्या सहा महिन्याासून चंदगड आगारामध्ये काय चाललेय हेच प्रवाशांना कळत नाही. चंदगड तालूक्यात गावोगावी धावणारी ही लाल परी आता दुर्मिळ झाली आहे. याचे कारण नेहमीच्या मार्गावरील वारंवार रद्द होणाऱ्या फेऱ्या. कोवाड - बेळगाव मार्गावर तर वारंवार एस. टी. च्या फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. बस येणार म्हणून वाट पाहत असलेल्या प्रवाशांना वाट बघून शेवटी खाजगी गाडी करण्याची वेळ येत आहे. शुकवार दि. ३ रोजी चंदगड बेळगाव आजरा - बेळगाव मुक्काम रद्द, चंदगड बेळगाव गडहिंग्लज मुक्काम रद्द, चंदगड बेळगाव - हाजगोळी मुक्काम, चंदगड बेळगाव हेरागुडवळे मुक्काम, चंदगड कोवाड -कालकुंद्री आदि मुक्काम बस रद्द केल्याने प्रवाशांनी जायचे कसे? हा प्रश्न निर्माण होत आहे. याचा परिणाम बेभरवशाची चंदगड डेपो झाल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वडाप सुसाट चालू आहे. आगार व्यवस्थापकानी याचा विचार करणे गरजेचे आहे.

       त्याचबरोबर आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन काम केल्यास चंदगड आगाराची मलीन होत असलेली प्रतिमा सुधारू शकेल. कर्मचाऱ्यांना त्रास म्हणजे एस. टी. ला त्रास. याचमुळे गाड्या ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढले आहे. मुंबई सारख्या मार्गावर आत्यंत निकृष्ठ गाडी पाठवून आगार व्यवस्थापकानी आपल्या अक्कलेचे तारे तोडलेच आहेत. प्रवाशांचा सहनशिलतेचा अंत आगार प्रशासनाने पाहू नये. अन्यथा भविष्यात याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. याची दखल व्यवस्थापकानी घेणे गरजेचे आहे. तरच चंदगड एस. टी. डेपोवर प्रवाशांचा पुन्हा एकदा भरोसा निर्माण होऊन एस. टी. च्या उत्पन्नातही वाढ होईल व ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांना सेवाही मिळेल.

No comments:

Post a Comment