४३ वर्षांनंतर वर्गमित्र कुटुंबासह एकत्र आले!, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आनंद गगनात मावेना!, 'न भूतो न भविष्यति’ असा कौटुंबिक सोहळा जल्लोषात! - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2023

४३ वर्षांनंतर वर्गमित्र कुटुंबासह एकत्र आले!, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आनंद गगनात मावेना!, 'न भूतो न भविष्यति’ असा कौटुंबिक सोहळा जल्लोषात!

आजरा  / सी. एल. वृतसेवा

       संसाराच्या रहाटगाड्यात आपण आज जीवन जगत आहोत, परंतु लहानपणीच्या म्हणजेच आपण शिकलेल्या शाळेतील आठवणी मात्र विसरू शकत नाही. आजही आपण या ना त्या कारणाने सगळ्यांशी संवाद साधून मनमोकळ्या गप्पा मारत असतो. कितीही मोठा माणूस असू दे किंवा कितीही छोटा माणूस असू दे आपण एकमेकांना भेटल्याशिवाय कधीच राहत नाही. अशीच घटना वर्गमित्रांच्या बाबतीत घडली असून ४३ वर्षांनंतर आमची शाळा - आम्ही वर्गमित्रया माध्यमातून सर्व वर्गमित्र सहकुटुंब भादवण (ता. आजरा) एकत्र आले. 

           १९७० - ७१  ते १९७९-८०  या सालात पहिली ते दहावी शिकलेले सर्व वर्गमित्र ४३ वर्षांनंतर एकत्र आले आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शाळांच्या आठवणीत रमून गेले. सर्व वर्गमित्रांनी एकत्र येऊन ‘कौटुंबिक मेळावा’ साजरा करून मौजमजा केली. या वेळी या सर्व वर्गमित्रांना मात्र पुन्हा एकदा आपण शाळेतच आल्यासारखे वाटले. सहकुटुंब सहपरिवार भेटल्यामुळे सगळ्यांच्या चेहर्‍यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या कौटुंबिक सोहळ्यात आकर्षण ठरले ते कुटुंबाच्या छायाचित्रासह माहितीपूर्ण काढलेली स्मरणिका. आजपर्यंत अशी संकल्पना कुणीही राबवली नाही.  

        स्मरणिका प्रकाशन, सत्कार समारंभ, स्नेहभोजन, आठवणींचा जागर, गप्पागोष्टी आणि हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.  त्याचबरोबर या वर्गमित्रांनी जन्मदाते आई-वडील, गुरुजन व आपल्या कुटुंबाचा सत्कार समारंभ आयोजित करून कौटुंबिक सोहळा ‘न भूतो न भविष्यति’ असा जल्लोषात पार पाडला व पुढील वर्षी पुन्हा भेटू, या आविर्भावात सर्व जण सुखी संसाराच्या रहाटगाड्यात जीवन आनंदात घालविण्यासाठी मार्गस्थ झाले.

            यावेळी गणपती सदाशिव दिवेकर, गुंडोपंत तायाप्पा खोराटे, गणपती आप्पाजी गोईलकर, तुकाराम ज्योती पाटील, विलास शंकर राऊळ, तुकाराम मल्लाप्पा शिंदे, टी. ए. पाटील, नंदकुमार रामचंद्र सामंत, शशिकांत आप्पा सावंत, भिकाजी गुरव, काकाजी आबाजी देसाई, आनंदराव राणकू हुंदळेकर, वसंतराव रामचंद्र खोराटे या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्वागत अशोक चिमणे यांनी तर सूत्रसंचालन आनंद संकपाळ यांनी केले. 

No comments:

Post a Comment