मांडेदुर्ग परिसरात उसावर खोड किड व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल, उत्पादनात होणार घट - चंदगड लाईव्ह न्युज

17 May 2023

मांडेदुर्ग परिसरात उसावर खोड किड व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल, उत्पादनात होणार घट


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    हवामानातील बदल आणि अधूनमधून होणारा वळीव पाऊस व कडक ऊन यामुळे ऊस पिकावर तसेच भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव होत आहे. चंदगड तालुक्यातील नदीकाठी पुराच्या समस्येमुळे ऊस पीक क्षेत्र वाढले आहे. मात्र, सध्या खोड किडीच्या प्रादुर्भावास प्रारंभ झाला आहे. ऊस उत्पादकांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.      

    तालुक्याच्या पूर्व भागात मांडेदुर्ग, ढोलगरवाडी, कडलगे खुर्द, कडलगे बुद्रुक, नागरदळे, किणी, शिवनगे, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी, कोवाडसह अन्य गावात दिवसेंदिवस ऊस उत्पादन क्षेत्र वाढत आहे. ताम्रपर्णी नदी किनारी भात क्षेत्राची जागा आता ऊस पिकाने घेतली आहे. पुराने भात पीक कुजून जात असल्याने ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. वातावरणातील बदलामुळे तांबेराचा प्रादुर्भाव तुरळक प्रमाणात दिसून येत आहे. सध्या काही शेतकरी औषध फवारणी करत आहेत. तांबेरा हा रोग केवळ को ९२००५ या जातीच्या ऊसावरच पडत असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऊस लावण उशिरा केली आहे. अशा ऊस पिकाला अधिक खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे. उशिरा ऊस लावण करू नये, असे ऊस अभ्यासकांनी आवाहन केले आहे. त्यातच ऊस पिकावर अधिकाधिक खोडकिडीचा प्रसार होत आहे. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र आहे. या ठिकाणी भाजीपाला तसेच उसाच्या बुंध्याला कीड लागल्याने रोप वाळून जात आहे. कृषी विभागाकडून याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शिनोळी या परिसरात खोडकिडीला प्रारंभ झाला आहे. खोड किडीच्या नियंत्रणा करिता दोन पाण्याच्या पाळीतील अंतर कमी करावे, जेणे करुन जमिनीत पुरेसा ओलावा राहील. तसेच बाजारात उपलब्ध असणारे कोराजन हे कंटेन्स असणारे औषध ६ मिली प्रतिपंप प्रमाणे आळवणी केल्यास किड आटोक्यात येईल.




No comments:

Post a Comment