इंदुरीकर महाराजांचा भव्य दिव्य कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न, हजारोंची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2023

इंदुरीकर महाराजांचा भव्य दिव्य कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न, हजारोंची उपस्थिती


तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा
    आज आपल्या देशात तरुणांची मोठी शक्ती आहे. ही शक्ती देशाच्या सत्कारणी लागली तर  देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. परंतु आजचा आपला तरुण व्यसनाच्या आहारी गुरफटला गेला आहे.  त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. टीव्ही आणि मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे देश प्रगतीच्या दिशेने जाण्याऐवजी अधोगतीच्या दिशेने चाललेला आहे.

    दुसऱ्यांना लुटून अन्यायाने आणि वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती कधीही आपल्याला सुख देऊ शकत नाही कष्टाने आणि चांगल्या मार्गाने मिळवलेली संपत्ती आपल्या जीवनात शाश्वत सुख देऊ शकते. त्यामुळे कोणत्या मार्गाने संपत्ती मिळवायची हे ठरवण्याची वेळ आली आहे. सत्संग हा आपल्याला आयुष्याच्या चांगल्या वाटेवर घेऊन जाणारा मार्ग आहे, परंतु या मार्गावरून चालणे जीवनात अत्यंत खडतर असते सध्याच्या सत्संगाच्या संगतीत राहिलात तर आयुष्यात आपण श्रीमंत होऊ शकणार नाही परंतु आपण आयुष्यात बरबाद होणार नाही, याची आम्ही हमी देता. लग्नामध्ये नवरा नवरीच्या विविध विकृत अशा स्वरूपाच्या डिजिटल लावून प्रदर्शन करण्याची नवीन ट्रेंड आला आहे. नको त्या ठिकाणी पैशाची उधळण मोठ्या प्रमाणात केली जाते याला कुठेतरी पाय बंद घालण्याची गरज आहे. हा पैसा सामाजिक कार्यासाठी खर्ची घातला तर गरिबांना दिलासा देणारे ठरेल. स्थानिक राज्यकर्त्यांनी आठवड्यातून एक दिवस शाळेत जाऊन माझ्या कमतरता आहेत. त्या पुऱ्या करून संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचे काम करावे. कारण भविष्याची पिढी भविष्यकाळातील पिढी या शाळेमध्ये घडत असते. निसर्गातील अलीकडचे बदलते वातावरण  पाहिले तर एक व्यक्ती एक झाड लावणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांनी औरनाळ येथील किर्तन सोहळ्यात केले.
पंचायत समिती गडहिंग्लजचे माजी सभापती कै. सतीश पाटील यांच्या 46 व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य कीर्तन सोहळा सद्गुरु फौंडेशन औरनाळ तर्फे आयोजित केला होता.
        स्वागत राजेश पाटील औरनाळकर  यांनी तर प्रास्ताविक संपत सावंत यांनी केले. चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते इंदुरीकर महाराजांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग काकडे, सुरेश दास यांनी तर आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले.
     यावेळी डॉ. सतीश घाळी, रामाप्पा करीगार, बाबासाहेब पाटील अडकूरकर, भिकू गावडे, महेश सुर्वे, डॉक्टर पारिश चौगुले, अमर चव्हाण, अभय देसाई अडकुरकर, संतोष पाटील, एस्. एल, पाटील, प्रकाश उर्फ बाळासाहेब पवार, तानाजी गडकरी, महाबळेश्वर चौगुले, मनीषा तेली, श्रेया कोणकेरी, ललिता भोसले, बाबासाहेब पाटील गिजवणेकर आधीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment