![]() |
| नांदवडे (ता. चंदगड) येथील मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात झालेली गर्दी. |
संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज झालेल्या प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १ लाख ५३ हजार १४८ मतदारापैकी चुरशीने १ लाख ९ हजार २६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे चंदगड तालुक्यात सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान ७१.३४ टक्के मतदान झाले. यामध्ये ५४ हजार १८८ पुरुष व ५५ हजार ०७२ महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा अधिक राहिल्याने लोकशाही प्रक्रियेत महिलांची वाढती सक्रियता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रणरणत्या उन्हालाही न जुमानता मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावल्याने प्रशासन व निवडणूक यंत्रणेत समाधानाचे वातावरण आहे.
![]() |
| अडकूर मतदार संघाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्री लक्ष्मण गावडे यांनी जांबरे ह्या त्यांच्या गावी स्वकुटुंबीय मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सर्वजण हात उंचावून दाखवताना. |
![]() |
| जांबरे (ता. चंदगड) येथील मतदान केंद्रावर प्रथम मतदार, नव्वद वर्षाच्या वयोवृद्ध मतदार व दिव्यांग मतदारांचे स्वागत झाले. |
उमेदवाराच्या पक्षांच्या कार्यकर्ते जास्तीत-जास्त मतदान करण्यासाठी आपल्या मर्जीतील लोकांना मतदान करण्यासाठी जागृती करत होते. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्याचे नियोजन काल रात्रीपासून करण्यात आले होते. विविध पक्षांचे कार्यकर्ते टेबल लावून मतदार यादीतील नाव मतदारांना शोधून देण्यास मदत करत होते.
![]() |
| कालकुंद्री केंद्रावर भेट देताना पंचायत समिती उमेदवार कमल आनंद देसाई |
महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी उभारण्यात आलेल्या सखी (पिंक) मतदान केंद्रालाही मोठा प्रतिसाद मिळाला. कोणेवाडी येथील २४५ क्रमांकाच्या मतदान केंद्राला प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव व गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुलभ व सुरक्षित पद्धतीने पार पाडल्याबद्दल प्रशासनाच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक झाले.
![]() |
| तुर्केवाडी येथे मतदारांच्या स्वागतासाठी कमानी लावण्यात आल्या होत्या. |
राजकीयदृष्ट्या पाहता, चंदगड तालुक्यात यंदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट व काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होत असल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळेच वाढलेली मतदानाची टक्केवारी ही जनतेच्या जागृतीचे व बदलाच्या अपेक्षांचे प्रतीक मानली जात आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात आता विजयाचे अंदाज बांधले जात असले, तरी अंतिम निकाल मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
![]() |
| कुदनुर येथे मतदार मतदानासाठी आल्यानंतर मतदान कार्ड उंचाऊन दाखविताना |
चंदगड तालुक्यात ७१.३४ टक्क्यांच्या विक्रमी मतदानाने चंदगड तालुक्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय जोडला असून, सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण तालुका निकालाच्या प्रतीक्षेत श्वास रोखून उभा आहे.
![]() |
| कुदनुर येथे नागोजी भावकांना पवार या ८० वर्षाच्या आजोबांना मतदानाचा हाक बजावला. |
हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ...........
मलगड (ता. चंदगड) येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी केंद्रावर आलेल्या ९० वर्षीय यशोदा दत्तू घोळसे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि मतदानापूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाले. लोकशाहीप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेने सर्वांनाच भावूक केले.
हेरे येथील आठवडा बाजार बंद .................
चंदगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान झाले. या पार्श्वभूमीवर हेरे येथील आठवडा बाजार आज प्रशासनाच्या सुचनेनुसार बंद ठेवण्यात आला होता.








No comments:
Post a Comment