महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा १९५३" ची राज्यामध्ये अंमलबजावणी करा - अध्यक्ष सुरेश केसरकर - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2023

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा १९५३" ची राज्यामध्ये अंमलबजावणी करा - अध्यक्ष सुरेश केसरकर

 


मुंबई / सी. एल. वृत्तसेवा 

          पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध क्षेत्रातील कामगारांच्या उन्नत्ती व प्रगतीकरीता असंघटीत कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करणेचा अतिशय चांगला निर्णय घेवून राज्य सरकारने असंघटीत कामगारांना दिलासा दिला आहे. सध्या नोंदीत कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रम यांचा लाभ भरीव स्वरूपात मिळत आहे. कारण सदर कामगार हे महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा १९५३ नुसार, संबंधित आस्थापना / संस्थेकडून नांदीत झालेले आहेत.

          मात्र अद्यापही महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा १९५३ नुसार, ५ पेक्षा जास्त कामगार कार्यरत असणाऱ्या कापड दुकाने / औषधी दुकाने / हॉटेल्स / लहान दवाखाने / पतसंस्था / सोसायट्या / मॉल्स / माल वाहतुक संस्था अशा विविध क्षेत्रातील मालक वर्गानी संबंधित कामगारांची, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे सुरुवातीपासून ते आजअखेर पर्यंत शासन नियमानुसार नोंदणी करून वर्गणी भरलेले दिसून येत नाही. हि बाब अत्यंत गंभीर व बेकायदेशीर आहे. यामुळे आजघडीला लाखो कामगार शासनाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रम यापासून वंचित व उपेक्षित आहेत. यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा १९५३ नुसार, वरीलप्रमाणे नमूद विविध क्षेत्रातील कामगार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत झाल्यास खऱ्या अर्थाने कामगार वर्गांची सर्वांगीण उन्नती व प्रगती साधण्याचे कार्य, राज्य शासनाकडून अधिक जोमाने तसेच प्रभावीपणे होणार आहे.

       त्यामुळे शासन निर्णय, अटी व शर्तीस अनुसरून राज्य सरकारच्यावतीने संबंधित विभागास योग्य ते आदेश पारीत करावेत. जेणेकरून शासनाच्या विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम यापासून वंचित व उपेक्षित असलेल्या लाखो कामगारांना लाभ मिळेल. यासाठी राज्य गुणवंत कामगार असोसिएशच्यावतीने शासनास पूर्ण सहकार्य करणेत येईल. अशाप्रकारचे लेखी निवेदन सोमवार दि. ७ ऑगष्ट रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, कामगार मंत्री, प्रधान सचिव कामगार, राज्याचे कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना प्रत्यक्ष दिले असलेचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

      यावेळी , राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे खजिनदार देवराव कोंडेकर, मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे,(S.E.0.) सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, मुंबई कार्याध्यक्ष सत्यवान भास्कर उपाध्यक्ष केरबा डावरे, प्रविण बहिरट, महादेव चक्के, दत्तात्रय शिरोडकर, काशिनाथ जनगावे, दत्तात्रय मुळीक, अच्युतराव माने, मारुतीराव जाधव, किसन शिर्लेकर, गुणवंत मिसलवाड, भरत सकपाळ, संजय कदम दिलीप साटम, नरेंद्र रहाटे, शैलेंद्रनाथ इंगळे, भगवान माने, संजय सासणे, गजाननराव घाडगे, रत्नाकर शिंदे आदी प्रमुख कार्यकारीणी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment