श्रीक्षेत्र वैजनाथ मंदिर परिसरात सभामंडपाचे भूमिपूजन - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2023

श्रीक्षेत्र वैजनाथ मंदिर परिसरात सभामंडपाचे भूमिपूजन

 

श्री वैजनाथ मंदिर येथे सभा मंडप भूमिपूजन प्रसंगी सौ रूपा खांडेकर, भैरू खांडेकर यांच्यासह देवस्थान कमिटी पदाधिकारी व मान्यवर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुक्यातील पुरातन श्रीक्षेत्र वैजनाथ मंदिर परिसरात नुकतेच सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या विभागाच्या पंचायत समिती सदस्या रूपा खांडेकर यांच्या फंडातून  या कामी रु. १० लाख मंजूर असून रूपा खांडेकर यांच्या हस्ते ८ ऑगस्ट रोजी सभा मंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले.

      पुराणकथात उल्लेख असलेल्या श्री वैजनाथ (बैद्यनाथ) चे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील मंदिर अकराव्या शतकातील असल्याचे शिलालेखावरून समजते. चंदगड, बेळगाव, गडहिंग्लज सह महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याला दक्षिण महाक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.  तथापि श्री वैजनाथ व आरोग्य भवानी ही जोड मंदिरे व त्यांचा परिसर गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित राहिला आहे.  गेल्या काही वर्षात मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवणे, साहित्य विक्रीच्या दुकानांना शिस्त, पाण्याची व्यवस्था अशा काही सुविधा दिसून येतात. पण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखालील अन्य मंदिरांच्या तुलनेत येथे सुविधांची वानवा असल्याचे भाविकांचे मत आहे. 

         सध्या रूपात खांडेकर यांच्या माध्यमातून प्रयत्नातून अत्यावश्यक सभा मंडप साकारणार आहे. याबद्दल भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भैरू कृष्णा खांडेकर (शिनोळी), देवालय स्थानिक उपसमिती अध्यक्षा  गीतांजली सुतार, ग्रापं. सदस्या मंजुळा कांबळे, देवस्थान कमिटी पदाधिकारी शंकर भोगण, शिवाजी भोगण, जयवंत कांबळे, अमोल भोगण, उमेश भांदुर्गे, राजाराम करडे, वैजू पुजारी, संजय भोगण, प्रमोद केसरकर,  सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक प्रज्ञावंत उपस्थित होते. जयवंत कांबळे यांनी प्रास्ताविक केले. उमेश भांदुर्गे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment