किटवाड धरणावर गोधडी महोत्सव.....? की सेल्फी पॉईंट - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2023

किटवाड धरणावर गोधडी महोत्सव.....? की सेल्फी पॉईंट

 

किटवाड धरण नंबर २ वर अंथरून पांघरून धुण्यासाठी झालेली गर्दी. तर दुसऱ्या छायाचित्रात लक्ष वेधून घेणाऱ्या वाळत घातलेल्या रंगीबेरंगी वाकळा 

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा  

       दसऱ्याचे घट बसले की कुटुंब वत्सल नागरिकांना वेध लागतात ते लवकरच येणाऱ्या हिवाळा ऋतूचे व गुलाबी थंडीचे. ही थंडी येण्यापूर्वी घरातील अंथरूण, पांघरूण, गोधड्या, वाकळा धुवून तयार ठेवल्याच पाहिजेत. पण हे सगळं कोठे नेऊन धुवायचं? हा प्रश्न पडला की आठवते ते किटवाडचे धरण...! 

      शिवसेना शासन काळात कृष्णा खोरे योजनेतून चंदगड तालुक्यात २३ धरणे झाली. त्यापैकी दोन धरणे किटवाड गावानजीक आहेत. या धरणामुळे परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटलाच. तथापि या धरणातील पाणी वाकळा धुण्यासाठी, तर धुतलेल्या वाकळा, अंथरून- पांघरून वाळवण्यासाठी धरणाच्या भिंतीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पंचक्रोशीतील किटवाड सह कुदनूर, कालकुंद्री, होसुर या गावांबरोबरच कर्नाटकातील हंदिगनूर, बोडकेनहट्टी आदी गावांतील नागरिक टेम्पो, ट्रॅक्टर व मिळेल त्या वाहनात अंथरून पांघरून भरून येथे धुण्यासाठी आणत आहेत. 

         वाळत घातलेल्या रंगीबेरंगी वाकळा, गोधड्या पाहून जणू येथे गोधडी महोत्सव भरला आहे की काय..! अशी शंका नजीकच्या रस्त्यावरून येणाजाणार्‍या नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. काही ना तर येथे फोटो व सेल्फीचा मोह सुध्दा काही वेळ थांबायला भाग पडतो. धरण परिसरात अंथरूण, पांघरूण धुणे व वाळवण्याची सोय बऱ्यापैकी असल्यामुळे नद्यांच्या घाटावरील गर्दी अपसुकच कमी झाल्याचे चित्र चंदगड तालुक्याचे पूर्व भागात दिसत आहे.

       धुतलेले अंथरूण पांघरूण वाळेपर्यंत सोबत आणलेल्या जेवणाचा आस्वाद म्हणजे धुलाई बरोबरच कुटुंब कबिल्याचे 'पिकनिक' वनभोजन सुद्धा होत आहे.

No comments:

Post a Comment