हडलगे बालक मारहाण प्रकरणी जिल्हा बाल विकास व बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी गावात केली कसून चौकशी - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2024

हडलगे बालक मारहाण प्रकरणी जिल्हा बाल विकास व बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी गावात केली कसून चौकशी

 

हडलगे येथे बालक मारहाण प्रकरणी चौकशी करताना जिल्हा बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, बालसंरक्षण अधिकारी सागर दाते,  समुपदेशक अभिजित पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे पोल्ट्रीचे नुकसान केले म्हणून तीन बालकांना  पोल्ट्रीतच बांधून घालून  मारहाण केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसा पूर्वी घडली होती. या घटनेचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाल्याने याची गांभीर्याने दखल घेत कोल्हापूर जिल्हाच्या बालविकास अधिकाऱ्यांनी हडलगेत प्रत्यक्ष येऊन घटना स्थळाची पहाणी करून पिडीत बालक व त्यांच्या पालकांशी सविस्तर चर्चा केली.

     येथील  विजय सुभाष कुंभार यांनी भाडेतत्वावर घेतलेल्या पोल्ट्रीतील पाण्यामध्ये  पाईप क्लिंनिंगचे केमिकल टाकून कोंबड्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या संशयावरून येथील तीन अल्पवयीन मुलांना विजयने मारहाण केली होती. यानंतर हे प्रकरण स्थानिक पातळीवर मिटवण्यात आले होते. पण याचा व्हीडीओ न्यूज चॅनेलवर प्रसारित झाल्याने यातील एका मुलाच्या पालकाने नेसरी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानुसार विजय कुंभारवर  गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. सध्या संशयित विजयची तब्बेत बिघडत्याने त्याला गडहिंग्लज येथील एका खाजगी ऋग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. 

         या प्रकरणाची गांभीर्याने व तात्काळ दखल घेत कोल्हापूर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते, जिल्हा बाल संरक्षण कक्ष कोल्हापूरचे समुपदेशक अभिजित पाटील यानी हडलगे येथील घटना स्थळी भेट देवून सविस्तर पहाणी केली. तसेच संबंधीत तीन मुलांच्या घरी भेट देवून त्या सर्व मुलांशी सविस्तर संवाद साधला. पालकांशी चर्चा केली. याबरोबरच हडलगे ग्रामपंचायत प्रशासनाला सविस्तर सूचना दिल्या. बालकावर होणारा  अत्याचार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने कठोर पावले उचलावीत, पालक मेळावा घ्यावा, महिलांना मार्गदर्शन करावे, शाळेमध्ये मुलांनाही मार्गदर्शन करण्याच्या सुचना केल्या.

       यावेळी हडलगेचे सरपंच हणमंत पाटील, पोलिस पाटील यल्लापा नाईक, ग्रामसेवक  दत्ता पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते. या घटनेचा सविस्तर चौकशी अहवाल त्वरीत राज्यपालांना पाठवण्यात येणार आहे. यासंदर्भातील पोलिस व वैद्यकिय विभागाकडूनही माहिती घेण्यात येणार असल्याचे  कोल्हापूर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी चंदगड लाईव्ह न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment