सातव्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच...! विधानसभा मतमोजणी प्रश्नी हळदणकर यांचे आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2024

सातव्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच...! विधानसभा मतमोजणी प्रश्नी हळदणकर यांचे आंदोलन

उपोषणास बसलेल्या बाळासाहेब हळदणकर यांना पाठिंबा व्यक्त करणारे नागरिक

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   'चंदगड' विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतरची मतमोजणी गडहिंग्लज मध्ये केली जाते. त्याऐवजी ती चंदगड मध्येच झाली पाहिजे. या मागणीसाठी चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर यांनी तहसीलदार कार्यालय चंदगड समोर सुरू केलेले आमरण उपोषण आज सातव्या दिवशीही सुरूच राहिले. सात दिवसात एक हजारहून अधिक नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला आहे.
 विधानसभा निवडणुकी वेळी इतर प्रक्रिया चंदगड मधून होतात. मग मतमोजणीच गडहिंग्लजला का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी ही मतमोजणी चंदगडला करण्याची मागणी केली होती. याबाबत दि ४ व १९ जुलै रोजी निवेदन तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व निवडणूक आयोग महाराष्ट्र यांना दिले होते. वरील आदेश प्रशासन व निवडणूक आयोगाने १४ ऑगस्ट पूर्वी न काढल्यास तहसील कार्यालय चंदगड समोर १५ ऑगस्ट २०२४ पासून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तथापि प्रशासनाने त्यांच्या इशाऱ्याची कोणतीच दखल न घेतल्याने त्यांनी १५ ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले आहे. गेल्या सात दिवसात अनेक राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी यांच्यासह नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला आहे. यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. तहसीलदार राजेश चव्हाण व नायब तहसीलदार हेमंत कामत आंदोलनाचे पहिले दोन दिवस हळदणकर यांच्याशी चर्चा केली. तथापि निवडणूक आयोगाच्या लेखी पत्रासाठी आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान सातव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली असून याबाबत तहसीलदार चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 
      दरम्यान चंदगड तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय नेते येऊन उपोषण स्थळी पाठिंबा देऊन गेले. तथापि १५ ऑगस्ट रोजी उपोषण सुरू असताना आमदार राजेश पाटील उपोषण मंडप समोरून गेले पण त्यांनी साधी चौकशीही केली नाही. याबाबत हळदणकर यांनी नाराजी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment