हलकर्णी महाविद्यालयात एक दिवशीय राष्ट्रीय परिसंवाद संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2024

हलकर्णी महाविद्यालयात एक दिवशीय राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

 


चंदगड / प्रतिनिधी 

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग आणि नॅक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "ॲडव्हान्समेंट्स इन एन एम आर स्पेक्ट्रोस्कॉपी थेरी अँड एप्लीकेशन्स" या विषयावरती

 एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर उपस्थित होते. फर्ग्युसन कॉलेज पुणे येथील रसायनशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुशीलकुमार धनमाने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

प्रारंभी रोपट्याला पाणी घालून या एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. सुशीलकुमार धनमाने, प्राचार्य डॉ. बी डी अजळकर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ए एस बागवान, नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे, प्रा. ए एस जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

या एकदिवशीय राष्ट्रीय परिसंवाद आयोजनामागचा हेतू व उद्देश आपला प्रास्ताविकातून रसायनशास्त्र विभाग प्रमुख व संयोजक प्रा. ए एस बागवान यांनी सविस्तरपणे विषद केला. पाहुण्यांचा परिचय समन्वयक प्रा. विजय घोडके यांनी करून दिला.  पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे प्रा. विजय घोडके यांचा जर्मन पेटंट मिळाल्याबद्दल सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ सुशीलकुमार धनमाने यांनी आपल्या मनोगतात बोलताना 'एन एम आर स्पेक्ट्रोस्कॉपी' या क्षेत्रात होत असलेल्या विकासावर प्रकाश टाकला. खास करून एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांसाठी ही टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आहे संशोधनाच्या दृष्टीकोनातून आणि वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याचा वापर किती मोठ्या प्रमाणात केला जातो याबद्दल त्यांनी विवेचन केले. त्यासाठी सर्वांनी एन एम आर तंत्र समजून घेणे गरजेचे आहे आणि त्याची तत्वे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात अवलंबली पाहिजेत जेणेकरून आपण विविध प्रकारचे संशोधन करू शकतो तसेच या तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यकालीन संशोधनात मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो याबद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केले. 

अध्यक्षीय मनोगतात बोलताना प्राचार्य डॉ अजळकर म्हणाले,'विज्ञानाने खूप मोठी क्रांती केलेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या सहाय्याने आपण विविध प्रकारचे संशोधन करू शकतो. एनएमआर स्पेक्ट्रोस्कॉपी ही एक थेरी किती मोठ्या प्रमाणात आजच्या संशोधन युगात वापरले जाते याचा उपयोग आपण सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्यावा तसेच संशोधनाची आवड आपल्यामध्ये निर्माण व्हावी या हेतूने  एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.'

दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव,उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील,व्यवस्थापक मनोहर होसुरकर यांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन या राष्ट्रीय परिसंवादाच्या आयोजनासाठी लाभले.या परिसंवादाचा लाभ विविध महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घेतला. कर्नाटक राज्यातील बेळगाव धारवाड व बेंगलोर या ठिकाणाहून विद्यार्थी व विद्यार्थीनीं  तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी हा परिसंवाद यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. सुरज सुतार यांनी केले तर आभार नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment