कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
पर्यावरण साखळीत सापाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील बऱ्याचशा सापांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर असतानाच. दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे जगातील अति दुर्मिळ सापांपैकी एक असलेला उडता सोनसर्प (Ornata flying snake) आढळल्याने सर्प प्रेमी व अभ्यासक उत्साहित झाले आहेत. हेच साप चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड ते इसापूर दरम्यानच्या जंगल परिसरात नेहमी आढळत असल्याचे सांगितले जाते.
सह्याद्री डोंगर रांगांच्या दक्षिण टोकावरील गोवा व कर्नाटक राज्य हद्दीलगतचा म्हणजेच आंबोली, चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग ते दोडामार्ग पर्यंतचा पट्टा घनदाट जंगल व दऱ्याखोऱ्यांनी व्यापला आहे. येथे विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते. वाघांच्या प्रजातीमधील पट्टेरी वाघ, बिबट्या, ब्लॅक पॅंथर, स्थानिक भाषेतील वाघुट या छोट्या काळपट पट्टेरी वाघाबरोबरच अस्वल, सांबर, गवे, लांडगे, कोल्हे, भेकर, साळींदर, शेकरू आदी शेकडो वन्य प्राणी, पक्षी तर सुमारे २२ फूट लांबीचे अजगर व १४ फूट लांबीच्या किंग कोब्रासह सापांच्या शेकडो जाती आढळतात. त्यात आता अधिकृतपणे उडता सोनसर्प ( Ornata flying snake) आढळल्याने येथील नैसर्गिक जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी राज्य सरकारने चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील बराचसा भाग 'रिझर्व फॉरेस्ट' म्हणून घोषित केला आहे.
शुक्रवार दि. ८/११/२०२४ रोजी घोटगेवाडीतील सखाराम नारायण सुतार यांच्या घरा शेजारी हा सर्प दिसला. वेगळ्या प्रकारचा साप दिसताच लोकांनी सर्पमित्र लाडू गवस यांना पाचारण केले. यावेळी सर्पमित्र गवस यांनी क्रायसोपेलिया ऑर्नेटा (chrysopelea ornata ) प्रजातीमधील या सापाला सोनेरी झाड साप किंवा अलंकृत उडणारा साप (गोल्डन ट्री स्नेक, गोल्डन ऑर्नेट स्नेक) म्हणूनही ओळखले जाते असे सांगितले. हा दक्षिण आणि आग्नेय आशियात, विशेषतः भारत, थायलंड, मलेशिया, सिंगापूर येथील जंगलात आढळतो. हा निमविषारी प्रकारातील आहे. हिरवट पिवळा रंग, अंगावर काळे पट्टे व विविध रंगी सुंदर नक्षी असते. आकार साधारणतः ३-४ फुट लांबीचा असून शरीर रचना लांबट व थोडी चपटी असते. ज्यामुळे त्याला हवेत तरंगण्यास किंवा झेप घेण्यास मदत होते. हा साप पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. याबाबत वन अधिकाऱ्यांना माहिती देऊन सर्पमित्र गवस यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
No comments:
Post a Comment