![]() |
कालकुंद्री येथील केंद्र शाळेची कोसळलेली संरक्षण भिंत |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत बुधवारी दि २२/१/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता कोसळली. सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांची शाळा आवारात वर्दळ नसल्याने अनर्थ टळला. कालकुंद्री- कागणी रस्त्यावर या भिंती कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर भिंत पडल्यामुळे ट्रालीचे किरकोळ नुकसान झाले.
वीस वर्षांपूर्वी तत्कालीन पंचायत समिती सदस्य दत्तू कांबळे यांच्या फंडातून व सभापती यशवंत सोनार यांच्या सहकार्याने ह्या भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. सिमेंट ब्लॉक मध्ये बांधलेल्या या भिंतीच्या खालून झाडांची मुळे गेल्यामुळे भिंत कमकुवत झाली होती. परिणामी भिंतीचा सुमारे २५ फूट लांबीचा भाग कोसळला तथापि उर्वरित ८० फूट लांबीचा भागही झाडांची मुळे व अन्य कारणांमुळे कमकुवत झाल्याने केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून उर्वरित भिंत काढून नवीन भिंत बांधावी अशी मागणी होत आहे. घटनेनंतर लागलीच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी पाहणी केली. यावेळी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
चंदगड तालुक्यातील अनेक शाळांच्या संरक्षण भिंतीची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. बऱ्याच शाळांना तर अद्याप संरक्षण भिंती नसल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना मोकाट कुत्री, जनावरांचा त्रास सहन करावा लागतो.
No comments:
Post a Comment