पत्रकार नंदकुमार ढेरे यांना 'समाज जीवन गौरव पुरस्कार' - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2025

पत्रकार नंदकुमार ढेरे यांना 'समाज जीवन गौरव पुरस्कार'

 

नंदकुमार ढेरे

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       चंदगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व पत्रकार नंदकुमार पांडुरंग ढेरे (रा. रामपूर, ता. चंदगड) यांना मानाचा 'समाज जीवन गौरव पुरस्कार' नुकताच जाहीर झाला आहे. एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण 'राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन बेळगाव २०२५' अंतर्गत लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) बेळगाव येथे शनिवार दि. २५ जानेवारी २०२५ रोजी दु.११ वाजता माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, निवृत्त सेना अधिकारी गजानन चव्हाण, बेळगावचे माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, चित्रपट अभिनेते चंद्रकांत लोंढे, बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर, उद्योजिका पूनम मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

       नंदकुमार ढेरे यांनी २२ वर्षे दैनिक लोकमत तसेच गेल्या ५ वर्षांपासून सुरू असलेल्या चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह न्युज चॅनेल चे पत्रकार म्हणून केलेली समाजसेवा व पत्रकारितेच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील गोरगरीब जनतेची निस्वार्थी भावनेतून अनेक कामे केली आहेत. चंदगड तालुका पत्रकार संघाचे ते सन २०१८ ते २३ अशी पाच वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात चंदगड तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेच्या 'वसंतराव काणे राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ' पुरस्काराने अक्कलकोट जि. सोलापूर येथे सन २०२० मध्ये सन्मानित करण्यात आले, तर दुसरा पुरस्कार बेळगाव सन २०२२ मध्ये प्रदान करण्यात आला. ढेरे यांना यापूर्वी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या 'प्र के अत्रे आदर्श पत्रकार' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले  आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन एशियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्काराचे वितरण जीवन संघर्ष फाउंडेशन बेळगाव आयोजित कार्यक्रमात होणार आहे.

       पत्रकार म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्र राज्य शासनाची परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची महसूल विभागात तलाठी पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. सध्या ते जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वला 'समाज जीवन गौरव पुरस्कार' प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे माध्यम क्षेत्रासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment