कोवाड प्रा. आ. केंद्रातील "एकेकाची भट्टी लावतो" म्हणून धमकी देणाऱ्याचीच भट्टी लागणार! आरोग्य कर्मचारी संघटना आक्रमक - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2025

कोवाड प्रा. आ. केंद्रातील "एकेकाची भट्टी लावतो" म्हणून धमकी देणाऱ्याचीच भट्टी लागणार! आरोग्य कर्मचारी संघटना आक्रमक

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

        कोवाड (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालयात रात्रीच्या वेळी जाऊन आरोग्य सेविकेला शिवीगाळ व असभ्य वर्तन करत "सकाळपर्यंत सगळ्यांची कशी भट्टी लावतो बघा." अशी धमकी देणाऱ्या दुंडगे, ता चंदगड येथील दोघांनाही हे प्रकरण चांगलेच शेकणार असे दिसत आहे. कोल्हापूर जिल्हा नर्सेस संघटना तसेच जिप. आरोग्य सेवा संघटनांनी या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोवाड ग्रामपंचायतनेही आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याबरोबरच अशा समाजकंटकांना धडा शिकवू असे म्हटले आहे. आरोग्य सेविकेच्या फिर्यादीवरून या घटनेची नोंद कोवाड व चंदगड पोलिसात झाली आहे.

       याबाबत पोलीस व ग्रामपंचायत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दि १/४/२०२५ रोजी रात्री १२.४७ वाजता घटनेतील संशयित आरोपी रोहित पाटील (ठाणे) व सूर्यकांत पाटील (दुंडगे) यांनी आरोग्य केंद्रात जाऊन ड्युटीवर असलेल्या आरोग्य सेविकेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नांगरे यांना फोन करून शासकीय कामात अडथळा होईल अशा असभ्य भाषेत संभाषण केले. सूर्यकांत पाटील यांने फिर्यादी व साक्षीदार शिपाई सुनील गायकवाड यांना "तुमची सगळ्यांची कशी भट्टी लावतो ते बघा. तुम्हाला उद्यापर्यंत ठेवत नाही." अशी धमकी देऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या बाबत दि २ एप्रिल रोजी आरोपींवर गुन्हा नोंद झाला असून याबाबत पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोहेकॉ जमील मकानदार तपास करत आहेत.

   या घटनेची माहिती समजताच दि ३ व ४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मंगल पाटील, उपाध्यक्ष पूजा घाटगे, राज्य संघटक सुनिता गडदे, प्रसिद्धी प्रमुख शबनम नालबंद, चंदगड तालुका अध्यक्ष ज्योती ओऊळकर, महाराष्ट्र राज्य जिप. आरोग्य सेवा संघटना जिल्हा कार्याध्यक्ष महेश कुमार देशमुख, चंदगड तालुकाध्यक्ष पी टी मेंगाने, तसेच सर्व सदस्यांनी कोवाड येथे जाऊन पीडित आरोग्यसेविकेला धीर दिला. यावेळी आरोपींच्या निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. सर्वांनी कोवाड ग्रामपं सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील व चंदगड पोलीस स्टेशनशी प्रत्यक्ष संपर्क साधून आरोपीला कठोर शासन होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. अशी विनंती केली. दुंडगे ग्रामपंचायत कमिटीला भेटून दोन्ही आरोपींना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू नका, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याबाबत चर्चा केली. तसेच आपण याप्रकरणी न्याय मिळेपर्यंत लढा देणार असल्याची घोषणा केली. आहे. 

       दरम्यान आरोग्य सेविका यांना नाटक देणाऱ्या आरोपी सूर्यकांत पाटील यांचे कोवाड येथे सुरू असलेले सायबर कॅफे आपण चालू देणार नाही ते त्वरित बंद करण्याचा निर्णय कोवाड ग्रामपंचायत प्रशासनाने घेतल्याचे समजते. 

No comments:

Post a Comment