पोलिसांना १०-१५ वर्षे गुंगारा देणाऱ्या मोटर पंप केबल चोरांना अखेर सतर्क शेतकऱ्यांनीच पकडले - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2025

पोलिसांना १०-१५ वर्षे गुंगारा देणाऱ्या मोटर पंप केबल चोरांना अखेर सतर्क शेतकऱ्यांनीच पकडले

पकडण्यात आलेले संशयित आरोपी

कुदनूर : सी एल वृत्तसेवा 

      गेले १० ते १५ वर्षे चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील किटवाड नंबर १, किटवाड नंबर २, दिंडलकोप, तळगुळी, निट्टूर, मलतवाडी परिसरातील लघु पाटबंधारे धरणांवर असलेल्या मोटर पंपांच्या केबल वारंवार चोरीला जात होत्या. या केबल चोरट्यांनी परिसरात धुमाकूळ घातला होता. अनेक वेळा या घटनांच्या नोंदी पोलिसात झाल्या होत्या. तथापि त्यांचा छडा लावणे पोलिसांना शक्य झाले नव्हते. 

     अखेर काल दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेबारा ते एकच्या सरास खन्नेट्टी गावातील धाडसी ग्रामस्थांनी या चोरट्यांना रंगेहात पकडले. यातील एक चोरटा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पण दोन आरोपींना ग्रामस्थांनी पकडण्यात यश मिळवले. आपत्कालीन 100 या पोलीस क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर कोवाड पोलीस दूर क्षेत्रचे पोलीस उप निरीक्षक भिंगारदेवे, पुनाळकर, पंकज कांबळे आदी पोलीस कर्मचारी व कुदनूर' खन्नेटीचे पोलीस पाटील नामदेव लोहार रात्री साडेतीन वाजता घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कापून पोत्यात भरलेल्या मोटर पंप केबल वायर असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे समजते. 

      गेली अनेक वर्ष पूर्व भागातील विविध धरणे व नद्यांवर बसवलेल्या विद्युत मोटर पंपच्या केबल चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे शेतकरी अक्षरशः वैतागून गेले होते. अखेर धाडस करून खन्नेटी ग्रामस्थांनी चोरांना पकडल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पकडण्यात आलेल्या चोरां पैकी एकाने आपण दड्डी गावचा तर दुसऱ्याने पाटणे फाट्यावरील असल्याचे सांगितले. तसेच आपण या परिसरात सातआठ वेळा केबल चोरी केल्याचेही कबूल केले.

    पकडलेल्या दोन्ही चोरांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. या चोरट्यांकडून यापूर्वी झालेल्या केबल चोरीच्या प्रकारांचा छडा लागेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments:

Post a Comment