चंदगड : सी एल वृत्तसेवा
लवकरच राजगोळी खुर्द व भागातील भूमिपुत्र तरुणांना ओलम ग्लोबल ॲग्रो कमोडिटीज या राजगोळी खुर्द, ता. चंदगड नजीकच्या खाजगी साखर कारखान्यातील नोकर भरती प्रक्रियेत सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर काल शुक्रवार दि. १२ रोजी सुरू असलेले आंदोलन स्थानिक ग्रामस्थांनी तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय काल रात्री झालेल्या बैठकीत घेतला.
भागातील तरुणांना कारखाना कामगार म्हणून नोकरी देताना हेतूपुरस्सर डावलत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. अनेक वेळा अर्ज विनंती करूनही कारखाना प्रशासन आपल्या मागण्यांकडे लक्ष देत नाही या निषेधार्थ राजगोळी ग्रामस्थांनी स्वमालकीच्या रस्त्यावरून कारखान्याकडे होणारी ऊस वाहतूक रोखून धरली होती. या आंदोलनामुळे कारखान्याकडे जाणारी शेकडो वाहने रस्त्यावर खोळंबून राहिल्याने कागणी, कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी ते दड्डी, हत्तरगी या वर्दळीच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अखेर काल दि. १२ रोजी रात्री उशिरा कारखाना व्यवस्थापनाचे प्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यातील चर्चेनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.
राजगोळी खुर्द येथे माजी जि. प. सदस्य मल्लिकार्जुन मुगेरी यांच्या नेतृत्वाखालील काल शुक्रवारी सकाळपासून हे आंदोलन सुरू होते. अखेर रात्री उशिरा कारखाना प्रतिनिधी म्हणून एचआर हेड महेश भोसले व अनिल पाटील यांनी मल्लिकार्जुन मुगेरी, जोतिबा भांदुर्गे, नरसिंग धबाले आदींसह ग्रामस्थांसोबत बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले.
ओलम कारखाना साखर कारखाना येत्या तीन-चार महिन्यात कारखाना आवारात डिस्टिलरी प्लांट कार्यान्वित करणार आहे. या ठिकाणी कामगारांची गरज भासणार असून डिस्टिलरी विभागातील कामगार भरती वेळी प्राधान्याने येथील भूमिपुत्रांना सामावून घेतले जाईल असे तोंडी आश्वासन कारखाना प्रशासनाकडून मिळाले. तथापि आम्हाला रोजंदारीवर किंवा कंत्राटी कामगार म्हणून नोकरी नको असून कारखान्याचे कामगार म्हणून कायमस्वरूपी नोकरी पाहिजे. असे सांगून दिलेला शब्द न पाळल्यास पुन्हा यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा मुगेरी यांनी प्रशासनाला दिला आहे. या चर्चेवेळी बाबू कांबळे, रवी मोरे, डॉ. सुहास धबाले, कल्लाप्पा शिंदे, बसू अंगडी, यशवंत मोरे, नारायण तोंडले, संतराम भांदुर्गे, वीरुपाक्ष कुंभार आदींसह सुमारे शंभर ते दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment