एसटी बस व प्रवाशांचे संग्रहित छायाचित्र
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड एस टी आगारामध्ये बुधवार दि. २३/०४/२०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत 'प्रवासी राजा दिन' व 'कामगार पालक दिन' हा उपक्रम राबवला जाणार आहे. अशी माहिती चंदगड आगारचे व्यवस्थापक सतीश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवासी वर्गाच्या तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे प्रवास संदर्भात तसेच कामकाज संदर्भात उद्भवणाऱ्या तक्रारींचे निवारण आता डेपो पातळीवर करण्याचे महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने ठरवले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आदी विभागाच्या विभाग नियंत्रकांना या उपक्रमाची अंमलबजावणी ९ एप्रिल २०२५ पासून आठवड्यातून एकदा म्हणजे दर बुधवारी करावी. असे पत्राद्वारे कळवले आहे. परिवहन मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आता ग्रामीण भागातील प्रवासी तसेच एसटी कर्मचारी यांच्या समस्या सोडवल्या जातील अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही.
आपल्या नजीकच्या चंदगड आगारामध्ये 'प्रवासी राजा दिन' व 'कामगार पालक दिन' उपक्रम बुधवार दि. २३ रोजी राबवला जाणार आहे. याचा लाभ प्रवासी व कामगारांनी घ्यावा असे आवाहन चंदगड आगारचे कर्तव्यदक्ष व्यवस्थापक सतीश पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment