चंदगड तालुक्यातील दाटे येथे रविवारी जेष्ठ नागरीक स्नेहमेळाव्याचे आयोजन - जयवंत पाटील यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2025

चंदगड तालुक्यातील दाटे येथे रविवारी जेष्ठ नागरीक स्नेहमेळाव्याचे आयोजन - जयवंत पाटील यांची माहिती

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुका जेष्ठ नागरीक समन्वय समितीच्या वतीने रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता ज्ञानेश्वरी माऊली मंदिर दाटे (ता. चंदगड) येथे जेष्ठ नागरीक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चंदगड तालुका जेष्ठ नागरीक समन्वय समिती अध्यक्ष जयवंत भाऊ पाटील यांनी दिली. 

    या मेळाव्याचे उद्घाटन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते होईल. माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील अध्यक्षस्थानी असतील. माजी आमदार राजेश पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते गोपाळराव पाटील, अथर्व कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे, कोल्हापूर प्रादेशिक विभाग फेस्कॉमचे अध्यक्ष रामचंद्र पाटील प्रमुख अतिथी असतील. अखिल भारतीय वरिष्ठ नागरीक महासंघाचे सदस्य टी. आर. उर्फ रामकुमार सावंत प्रमुख मार्गदर्शक आहेत. 

    महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) ही आपल्या राज्यात सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेच्या ध्येयधोरणानुसार चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीने चंदगड तालूक्यात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. या मेळाव्याला तालुक्यातील सर्व जेष्ठ नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन चंदगड तालुका जेष्ठ नागरीक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

    यावेळी माहिती देताना अध्यक्ष जयवंत पाटील म्हणाले, ``आपल्या भारत देशात आज १६ कोटीपेक्षा अधिक लोक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्राचे 'ज्ञानबिंदू' व 'मानबिंदू' आहेत. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा देशाला निश्चितच फायदा होत आहे. ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक हे देशाचे खरे मावळे आहेत. ते देशाचे शिल्पकार आहेत. स्वातंत्र्य लढयापासून आजपर्यंत त्यांनी देशासाठी त्याग समर्पण केले आहे. पण त्यातील ६६% ज्येष्ठ नागरिक गरीब आहेत. ९०% ज्येष्ठांना सामाजिक व आरोग्य विषयक सुरक्षितता नाही. अनेक ज्येष्ठांचा छळ होत आहे. त्यांच्या आयुर्मानाबरोबरच त्यांचे आजारही वाढत आहेत. त्यातच राज्यातील शेतकरी, कामकरी, शेतमजूर हा देशाचा खरा पोशिंदा आहे. तो वयाच्या ७५ वर्षापर्यंत ऊन, पाऊस, थंडी वाऱ्याची पर्वा न करता रात्रं-दिवस शेतात कष्ट करतो, घाम गाळतो व अन्नधान्य निर्माण करतो. तेच अन्नधान्य खाऊन देशातील जनता जगते आहे. पण तोच पोशिंदा आज म्हातारपणी कर्जबाजारी होऊन उपाशीपोटी हालअपेष्ठा सोसून जगतो आहे. त्यातच गरीब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, कामगार, विधवा माता, अंध, बहिरे इत्यादि ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती बिकट आहे. अशा ज्येष्ठांना मानाच पानं (आधार) म्हणून इतर काही राज्याप्रमाणे शासनाने पेन्शन दयावी. ६० वर्षाच्या ज्येष्ठांना ६५ वर्षाप्रमाणे सवलती लागू कराव्यात. ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायदा २००७ ची सर्वत्र त्वरित अंमलबजावणी करावी. सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आजारासह व वयाच्या अटीशिवाय आरोग्यविमा योजना अंमलात आणावी. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारावीत, त्यांच्या कल्याणासाठी आर्थिक व इतर सुविधांबाबत तरतुद करावी. ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणे रेल्वे प्रवासात सवलत मिळावी. सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा विनाविलंब लाभ मिळावा अशा विविध मागण्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुख, शांती व समाधानासाठी प्रयत्न करणारी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) ही आपल्या राज्यात सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेच्या ध्येयधोरणानुसार चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीने चंदगड तालूक्यात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित रहावे.``


No comments:

Post a Comment