चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड या तालुक्याच्या ठिकाणापासून तालुक्याच्या पूर्व भागाला जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे ढोलगरवाडी फाटा ते राजगोळी खुर्द. अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या रस्त्यांपैकी सद्यःस्थितीत कडलगे खुर्द, कडलगे बुद्रुक, नागरदळे, किणी ते कोवाड या सुमारे ८-१० किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दैना उडाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यातील वळीवाच्या एकाच पावसात ही अवस्था असेल तर संपूर्ण पावसाळ्यात या मार्गावरून वाहने कशी न्यायची? हा प्रश्न वाहनधारक व प्रवाशांना पडला आहे.
वरील ढोलगरवाडी फाटा ते राजगोळी खुर्द मार्गापैकी कागणी पासून राजगोळी खुर्द पर्यंतचा दहा किलोमीटर रस्ता यंदा नवीन करण्यात आला आहे. हा रस्ता वाहनांची सध्या वाढलेली व दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता रुंदीकरणासह डांबरीकरण करण्याची आवश्यकता असताना केवळ एकेरी दहा फूट रुंदीचा करण्यात आला आहे. तर ढोलगरवाडी फाटा पासून मौजे कार्वे, मांडेदुर्ग, ढोलगरवाडी ते कडलगे खुर्द पर्यंत चा रस्ताही रुंदीकरणासह पूर्ण झाला आहे. मात्र यापुढील कडलगे खुर्द पासून कडलगे बुद्रुक, नागरदळे, किणी, कोवाड या टप्प्यातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.
नागरदळे गावातून जाताना रस्त्यात पडलेल्या प्रचंड आकाराच्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा डांबरी रस्त्यापर्यंत येऊन टेकलेली घरे, त्यातही घरासमोर ठेवण्यात आलेली लाकडे, विटा, वाळू आदी बांधकाम साहित्य, पार्क केलेली वाहने अडचणीत आणखीच भर टाकत आहेत. हीच अवस्था किणी गावातून येताना झालेली असून दोन वाहने समोरासमोर आली की बाजू काढताना अपघात व वादावादीचे प्रसंग घडत आहेत. संबंधित बांधकाम विभागाने हा रस्ता तात्काळ रुंदीकरण व डांबरीकरण करावा. तत्पूर्वी रस्त्यात वर्षानुवर्षे रस्त्यालगत लावली जाणारी वाहने व अडगळीच्या वस्तू काढून टाकाव्यात अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.
No comments:
Post a Comment