![]() |
| ढोलगरवाडी येथील सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील यांनी शिवणगे जवळ एकाच वेळी पकडलेले दोन खतरनाक विषारी घोणस नर मादी. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील यांनी गेल्या दोन दिवसांत तीन विषारी व एका बिनविषारी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सदाशिव पाटील यांनी गेल्या ३०-३५ वर्षांत रेस्क्यू केलेल्या सापांची संख्या आता सुमारे सात हजार पर्यंत पोहोचली आहे.
काल बुधवार दि. १५ /१०/२०२५ रोजी सकाळी दहा वाजता महादेव गोडसे, रा. माणगाव, ता. चंदगड यांच्या शिवणगे नदीकाठी (गोंडा वरती) असलेल्या शेतातील मोटर पंप नजीक प्रचंड विषारी मिलन अवस्थेतील दोन घोणस साप आढळले. गोडसे यांनी सदाशिव पाटील यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्याने ८ किलोमीटर वरील साप असलेल्या ठिकाणी जाऊन ह्या दोन्ही घोणस सापांना एकत्रितपणे पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडले.
तर दि. १४ रोजी रात्री मजरे कार्वे ता. चंदगड या ठिकाणी घरात बिनविषारी वेरुळा (पाण्याळा/ वॉटर स्नेक) सापडला. तसेच कडलगे बुद्रुक या ठिकाणी आरसीसी इमारतीत रात्री ११ वाजता अति विषारी मण्यार जातीचा साप आल्याने रहिवाशांची एकच भंबेरी उडाली. यावेळी संबंधितांनी सदाशिव पाटील यांना फोनवरून याची माहिती दिली यावेळी त्यांनी वेळ वाया न घालवता कडलगे येथे घटनास्थळी जाऊन मन्यार साप पकडला. व त्याला नैैसर्गिक अधिवासात रेस्क्यू केले.
सध्या मोठ्या संख्येने विषारी व बिनविषारी साप शेतकरी, ग्रामस्थांना आढळत आहेत. याबद्दल बोलताना प्रा. सदाशिव पाटील म्हणाले, सध्या सापांचा मिलन काळ आहे. तसेच सध्या आक्टोंबर हीट सुरू आहे. सकाळची थंडी दिवसभर उष्णता यामुळे दिवसा व रात्रीही साप निवाऱ्यातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे तापलेल्या मळलेल्या पाऊलवाटांवरून जाताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. वाढलेल्या गवतातून जात असताना किंवा शिवारातील पिकांमध्ये चालतानाा साप नजरेस पडत नाहीत नाहीत. नकळत सापावर पाय पडल्यास सर्पदंश होण्याची शक्यता असते. परिणामी या महिन्यात सर्पदंश होण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ढोलगरवाडी पंचक्रोशीत सात ते आठ सर्पदंश झाल्याचे सांगितले. या सर्व सर्पदंश बाधितांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल बेळगाव व ढोलगरवाडी सर्पशाळा येथे डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केल्याचे सांगितले.

No comments:
Post a Comment