चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवत्तेबरोबरच संवादकौशल्य, आत्मविश्वास, आणि प्रभावी व्यक्तिमत्व या गुणांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे असे मत डॉ. आर. के. तेलगोटे यांनी र. भा. माडखोलकर महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित गटचर्चा व मुलाखत तंत्र या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. हा उपक्रम विशेषतः BCA तृतीय वर्ष या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. डॉ. तेलगोटे यांनी पुढे विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, त्याचे महत्त्व, यशस्वी सहभागी होण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांची माहिती देताना सांगितले की, "गटचर्चा म्हणजे केवळ बोलणे नाही, तर इतरांच्या मतांचा आदर ठेवत आपल्या विचारांचे प्रभावी सादरीकरण हेच यशाचे गमक आहे." त्यानंतर त्यांनी मुलाखतीच्या विविध प्रकारांवर (व्यक्तिक, तांत्रिक, व HR मुलाखत) सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची तयारी कशी करावी, उत्तर देताना कोणते तंत्र वापरावे, देहबोलीचा उपयोग कसा करावा याचे सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. डी. गोरल होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. एन. के. पाटील यांनी या सत्रामागील उद्देश आणि गरज यांची सविस्तर माहिती देताना सांगितले की, "शैक्षणिक ज्ञानासोबत जर संवादकौशल्य, विचार स्पष्ट मांडण्याची क्षमता आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये असेल, तरच ते उत्तम व्यावसायिक बनू शकतात." कार्यक्रमाचे आभार डॉ. एस. डी. गवाडे यांनी मानले तर डॉ. जी. वाय. कांबळे आणि प्रा. आर. एस. गडकरी यांची उपस्थिती लाभली. दोघांनीही विद्यार्थ्यांना पुढील करिअरमध्ये अशा कौशल्यांचा उपयोग कसा होतो, याचे प्रात्यक्षिक उदाहरणे देत प्रेरणा दिली.
या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी कोडिंगमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भूमिका या विषयावर प्रत्यक्ष ग्रुप डिस्कशन आयोजित करण्यात आले. यामध्ये BCA III च्या ८ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कोडिंग क्षेत्रात होणारे बदल, त्याचे फायदे-तोटे, मानवी हस्तक्षेपाची गरज, व सर्जनशीलतेवरील परिणाम यावर सखोल चर्चा केली. चर्चेच्या शेवटी सर्वांनी एकमताने असा निष्कर्ष मांडला की, "आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही मानवी सर्जनशीलतेला पूरक ठरू शकते, ती त्याचा पर्याय नव्हे." हा संपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या संचार कौशल्य, विश्लेषण क्षमता, संघभावना आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला.
No comments:
Post a Comment