चंदगड: सी. एल. वृत्तसेवा
“मानसिक आरोग्य ही केवळ आजारपणाची अनुपस्थिती नसून मन, शरीर आणि भावना यांच्या संतुलनाचे प्रतीक आहे. आजच्या गतिमान जीवनात प्रत्येक व्यक्तीवर ताण आहे; परंतु तो ताण व्यवस्थापित करण्याची कला शिकली, तर जीवन अधिक सुंदर आणि आनंदी बनते,” असे प्रेरणादायी प्रतिपादन चंदगड येथील डॉ. देवकुमार सूर्यवंशी यांनी केले.
ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, “तणाव हा जीवनाचा एक भाग आहे. परंतु आपण त्याला शत्रू समजतो, हे चूक आहे. तणावाला संधी म्हणून स्वीकारले, तर व्यक्तिमत्त्व अधिक मजबूत बनते. आज अनेक तरुण मोबाईल, सोशल मीडिया आणि स्पर्धेच्या दबावामुळे मानसिकदृष्ट्या थकलेले आहेत. त्यांना ‘ब्रेक’ घेऊन स्वत:साठी वेळ देणे अत्यावश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले, “सकारात्मक विचार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, आणि आनंदी सहवास हे मानसिक आरोग्याचे चार स्तंभ आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने ‘मी सक्षम आहे, मी महत्त्वाचा आहे’ ही भावना मनात रुजवली पाहिजे. आत्मविश्वास आणि संयम या दोन गोष्टी जीवनातील कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद देतात.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मन:स्वास्थ्य टिकवण्यासाठी स्वत:शी प्रामाणिक राहण्याचा आणि सकारात्मक सहवास ठेवण्याचा सल्ला दिला.
प्रास्ताविक मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एल. भादवणकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment